दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील विडणी गावाच्या हद्दीमध्ये अब्दागिरेवाडी येथे फलटण शहरातील कुरेशीनगर येथे राहणाऱ्या इरफान याकूब कुरेशी याच्या मालकीच्या गोठ्यामध्ये तीन जर्सी गायी, ५४ जर्सी गायीची खोंडे व १२ देशी गायी असे एकूण ६९ जनावरे कत्तलीसाठी बेकायदेशीर डांबून ठेवलेल्या स्थितीत आढळून आल्याने इरफान याकूब कुरेशी, रा. कुरेशीनगर, फलटण याच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
या बाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी कि, दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विडणी गावाच्या हद्दीमध्ये अब्दागिरेवाडी येथे इरफान याकूब कुरेशी याच्या मालकीच्या गोठ्यामध्ये अंदाजे नव्वद हजार रुपये किमतीच्या तीन जर्सी गायी, चोपन्न हजार रुपये किमतीचे दोन ते तीन दिवसाची ५४ जर्सी गायीची खोंडे व दोन लाख ४० हजार रुपये किमतीची एक ते पाच वर्षे वयाची १२ देशी गायी असे एकूण तीन लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून आढळून आला. या बाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आरागडे करीत आहेत.