राज्याला शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर ठेवण्यासाठी सर्व मिळून काम करूया – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 18 फेब्रुवारी 2022 । मुंबई । शैक्षणिक क्षेत्रात राज्याला अग्रेसर ठेवण्यासाठी सर्व मिळून एकत्रित समन्वयाने काम करूया, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले.

सिम्बॉयसिस विद्यापीठ येथे आयोजित शालेय शिक्षण विभागाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राजेश कृष्णा यांच्यासह शिक्षण विभागाचे संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

श्रीमती गायकवाड म्हणाल्या, शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यात शैक्षणिक क्षेत्रात समन्वयातून चांगले कार्य सुरू आहे. विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी शालेय शिक्षण विभागात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. शिक्षण विभागात कार्य करताना त्यांनी अत्यंत लहान बाबी विचारात घेत नियोजन केले आहे. शालेय शिक्षण विभाग एक कुटुंब आहे, राज्याच्या शैक्षणिक विकासासाठी हे कुटुंब सातत्याने कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रत्येकाचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांकरिता चांगले, सुदृढ वातावरण निर्माण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. कोरोना कालावधीत शिक्षकांनी ऑनलाईन, ऑफलाईनसह विविध माध्यमातून शिक्षण देण्याचे कार्य केले. यापुढेही शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासोबतच पायाभुत सुविधा, तंत्रज्ञानाचा वापरही वाढविण्यात येणार असल्याचे श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.

अपर मुख्य सचिव श्रीमती कृष्णा म्हणाल्या, शालेय शिक्षण विभागात खुप काळ सेवा करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. विभागात सेवा करताना अनेक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला. आदर्श शाळा उपक्रमा अंतर्गत राज्यातील काही शाळा मॉडेल करण्याचा प्रयत्न आहे.

शिक्षण आयुक्त श्री. सोळंकी यांनी राज्याला शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन  केले.

यावेळी सेवापुर्तीनिमित्त शिक्षणमंत्री श्रीमती गायकवाड यांच्या हस्ते श्रीमती वंदना कृष्णा व राजेश कृष्णा यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शिक्षण विभागातील संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!