दैनिक स्थैर्य | दि. २२ जून २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, फलटण सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. फलटण येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थांनी श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल फलटण येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित होते.
श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुलच्या भव्य अशा मैदानावर दिड हजार विद्यार्थी, शंभर शिक्षक – शिक्षिका व फलटण बिल्डर्स असोसिएशनच्या बिल्डर्स, नवजीवन योगा वर्गाचे सहकारी व आकाश कला अकॅडमीचे सहकारी यांनी एकाच वेळी योग प्रात्यक्षिके करून योग दिन साजरा केला.
यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी आपले मत व्यक्त करताना प्रमुख व्यायामाचे व योगाचे महत्त्व याची माहिती देवून मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी योग साधनेची गरज असते, याचे महत्त्व सांगितले. आहार, विहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे आरोग्य बिघडते तर योगामुळे शरीर लवचिक होते, सामर्थ्य वाढते, रक्तवाहिन्यांचे आरोग्य उत्तम सुधारते आणि मानसिक ताणतणाव, नैराश्य दूर होण्यास मदत होते, असे सांगितले. योगसाधना करून ‘निरोगी भारत, आरोग्यसंपन्न भारत’ निर्माण करण्याचा संकल्प करूयात. दररोज योगसाधना, सूर्यनमस्कार, व्यायाम करून आपले आरोग्य उत्तम ठेवले तर मन प्रसन्न राहते. म्हणून दररोज योगसाधना करावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
योगासनांची माहिती सौ. राधिका नाळे यांनी दिली. यावेळी वीरभद्रासन, ताडासन, वज्रासन, बद्ध कोणासन, क्लॅपिग, कपालभाती, शुद्धीकरण क्रिया, भ्रामरी प्राणायाम, ओमकार, सूर्यनमस्कार यांची सामूहिक प्रात्यक्षिके घेतली. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटी व बिल्डर्स असोसिएशन फलटण या संस्थेच्या वतीने योग दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास फलटणचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रसाद जोशी, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने, बिल्डर असोसिएशनचे प्रमोद अण्णा निंबाळकर, राजीव नाईक निंबाळकर, सुनिल सस्ते, प्रसिद्ध आर्किटेक्ट महेंद्र जाधव, दाते मॅडम, नवजीवन योगा वर्गाच्या सौ.राधिका नाळे व त्यांचे सहकारी तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष रमणलाल आनंदलाल दोशी, सदस्य शिरीष शेठ दोशी, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे गजेंद्रगडकर, डॉ. रवींद्र बिचुकले, जगन्नाथ कापसे, आकाश कला अकॅडमीचे हर्षल कदम, माजी तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी शाळेचे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे, उपप्राचार्य ए. वाय. ननवरे, पर्यवेक्षक व्ही. जे. शिंदे, पर्यवेक्षिका सौ. बगाडे मॅडम व क्रिडा शिक्षक तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा मार्गदर्शक सचिन धुमाळ यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्राचार्य बाबासाहेब गंगवणे यांनी मानले.