स्थैर्य, पुणे, दि. २७: येरवडा कारागृहाचा इतिहास सर्वसामान्य लोकांना, विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना कळावा म्हणून येत्या 26 जानेवारीला पुण्यातील येरवडा तुरुंगात ‘जेल पर्यटन’ सुरु करत असल्याची घोषणा महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. आज या जेल पर्यटनाचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरंन्सिगच्या माध्यमातून केले. यावेळे त्यांनी बोलताना येरवडा कारागृहाच्या इतिहासाला उजाळा दिला. त्यांनी म्हटलं की, येरवडा तुरुंगात चाफेकर होते. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी होते. कालांतराने इंग्रज निघून गेले. मात्र, या खडतर इतिहासानेच भारत घडला आहे. जेल टुरीझम मधून दोन गोष्टी साध्य होतील. एकतर या स्वातंत्र्यासैनिकांनी घेतलेले कष्ट दिसून येतील तसेच या सगळ्यांचे झालेले हाल दिसून येतील. लोकांना त्याची जाणीव होईल. पुढे ते म्हणाले की, जेल पर्यटानातून येरवड्याच्या भींतीसुद्धा बोलू लागतील. त्या इतिहास सांगतील. आणखी मुद्दा म्हणजे या कारागृहात असलेल्या कैद्यांच्या शक्तीचा वापर कसा करायचा याचा. इथे असेलले कैदीचा म्हणजे मॅनपॉवर यांचा वापर कसा करायचा, यावर विचार करायला हवा. भरकटेलेल्या कैद्यांना मार्गावर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहिल.