स्थैर्य, मुंबई, दि.२२: दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे भगवान गडावर भव्य असा दसरा मेळावा घेत असतात. मात्र यंदा देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. यामुळे गर्दी जमवण्यासाठी परिस्थिती नाही. या काळात पंकजा मुंडे दसरा मेळावा कसा घेणार असा प्रश्न अनेकांना होता. आता पंकजा मुंडेंनी फेसबुकद्वारे याविषयी माहिती दिली आहे. यंदाचा दसरा मेळावा हा ऑनलाइन घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवरुन व्हिडिओ शेअर करत समर्थक आणि भगवान भक्तांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या दसऱ्याला वेगळ्या सिमोल्लंघनाचा निश्चिय करु, नवीन सिमोल्लंघनासाठी सर्व जणांनी तयार व्हा असे आवाहन पंकजा मुंडेंनी केले आहे.
फेसबुकद्वारे संवाद साधत पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘दरवर्षीप्रमाणे आपण दसऱ्या मेळाव्याची वाट बघत असता. मी देखील या मेळाव्याची वाट पाहते. गोपीनाथ मुंडे यांनी ही परंपरा सुरू केली आहे, ती पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे. मात्र, यंदा राज्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाच्या परिस्थिती असल्यामुळे यंदा तुम्हा सर्वांचे आरोग्य मला धोक्यात घालायचे नाही. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा वेगळ्या पद्धतीने आपण साजरा केला जाणार आहे. आपआपल्या घरी, गावात भगवान बाबांच्या चरणी सर्वांना नतमस्तक व्हा. भगवान बाबांचे पूजन करायचे आहे मोठ्या संख्येने हा कार्यक्रम करायचा आहे’, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.