स्थैर्य, मुंबई, दि.२४: मराठा आरक्षणाचा मुद्दा परत एकदा पेट घेताना दिसत आहे. मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांनी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज या आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी बोलताना प्रवीण दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढा. अन्यथा मराठा तरुणांबरोबर आम्हालाही उपोषणाला बसावे लागेल’, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी यावेळी दिला.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला जी मदत लागेल ती द्यायला आम्ही तयार आहोत. पण तोपर्यंत सरकारने एक अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. सरकार जर अध्यादेशाचा निर्णय घेणार नसेल तर आम्हालाही मराठा तरुणांसोबत उपोषणाला बसावे लागेल’, असा थेट इशारा दरेकर यांनी दिला.
दरेकर पुढे म्हणाले की, ‘मराठा समजाचा आक्रोश थांबला असेल, त्यांची ताकद संपली असेल, असे सरकारला वाटत असावे. त्यामुळेच आंदोलनाचा आवाज या सरकारच्या कानावर जात नाहीये. या आंदोलनाची दखल घेण्यासाठी सरकारचा एकही प्रतिनिधी आला नाही. हे गेंड्याच्या कातड्याचे सरकार आहे. ठाकरे सरकारच्या मनात पाप आहे’, अशी टीकाही त्यांनी केली.