स्थैर्य, सातारा, दि २६ : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजच्या प्रजासत्ताक दिनी तिघांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या तिन्ही नागरिकांना सातारा शहर पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. शहरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. सकाळपासून ठिकठिकाणी ध्वजवंदनाच्या कार्यक्रमांसह विविध समाज जागृतीचे कार्यक्रम झाले. दरम्यान येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलने झाली. काही आंदोलने हे शांततेत झाली तर काहींच्या आंदोलनामुळे पोलिसांची पळापळ झाली. सोनगाव येथील मागासवर्गीय कुटुंबातील एका नागरिकाने स्वतःच्या हातावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आज मला न्याय मिळाला पाहिजे असे ओरडत तो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतील प्रवेशद्वारात घुसण्याचा प्रयत्नात होतो. त्याच्या म्हणण्यानूसार जातीयवाद्यांनी माझे घर उद्धवस्त केले आहे. प्रशासन आणि पोलिस प्रशासन मला सहकार्य करीत नसल्याने मी आज हे आंदोलन केले. या लोकांनी मला त्रास दिल्यानेच मी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. दरम्यान संबंधित युवकाची चौकशी करुन पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती शहर पोलिसांतून देण्यात आली.
कण्हेर प्रकल्पातून पिपरी शहापूर येथे पुर्नवसन झालेल्या संतोष वांगडे आणि त्यांच्या सहका-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी उपसरपंचांना डांबून ठेवल्याचा आरोप वांगडे यांनी माध्यमांशी बोलताना केला. ते म्हणाले आमच्या गावाला महसूल दिला आणि अतिरिक्त महसूल पून्हा जोडला. तेथे 25 एकर आमच्या गावठानात जोडला आहे.तो आमच्या गावठानातून कमी करावा अशी मागणी आम्ही गेली चार वर्ष करीत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आम्ही कंटाळून आजचा प्रकार केला आहे. आज येथे आम्ही दोघे तिघे आलो आहे. हा लढा आम्ही सुरुच ठेवणार आहे. आमचा हक्क मिळविण्यासाठी आम्ही राहत्या ठिकाणी आत्मदहन करु शकतो असा इशाराही वांगडे यांनी प्रशासनास दिला.