स्थैर्य, मलकापूर (जि. सातारा), दि.१८: निसर्ग साखळीत प्राणी, पक्ष्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्राण्यांसह पक्ष्यांचे संगोपन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या हेतूने पक्ष्यांच्या संगोपनासाठी कऱ्हाड वनविभागाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. पक्षी सप्ताहनिमित्त आगाशिव डोंगरात प्रात्यक्षिक घेत 15 गावांत “पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा’चा संदेश देण्यात आला.
पक्षी सप्ताहानिमित्त येथील वनविभागाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. आसपासच्या 15 गावांत पक्ष्यांविषयी जनजागृती करण्यासाठी मोहीम राबवली. पक्षी वाचवा निसर्ग वाचवा, पक्ष्यांचे रक्षण सुख समृद्धीचे लक्षण, चलो आज आदमी से फरिश्ते बन जाये एक पक्षी की जान बचाएं, पक्षी है खेतों की शान, जीवन में एक नियम बनाओ पक्षीयोंको घर का सदस्य बनाओ, पक्षी बचाव जीवन बचाव असे अनेक संदेश देणारे फलक लावले आहेत.
आगाशिव डोंगरावर जखीणवाडी वनक्षेत्रात साताऱ्याचे सहायक वनसंरक्षक किरण कांबळे, कऱ्हाड वनक्षेत्रपाल अर्जुन गंभरे, कऱ्हाड वनपरिक्षेत्रातील सर्व वनरक्षक, वनपाल, ग्रामस्थ व पर्यटकांच्या उपस्थितीत वेगळा उपक्रम राबवला. या वेळी पक्ष्यांची नावे, ओळख, राहणीमान यांबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. गरूड, घार, मोर, लांडोर, बुलबुल, खंड्या, पोपट, सुतार पक्षी, चिमणी, पारवा आदी पक्ष्यांचे निरीक्षण केले. जमिनीवर आढळणारे, झाडावर राहणारे, तसेच पाण्यावर परिसंस्थेवर अवलंबून असणारे पक्षी हे संपूर्ण पृथ्वीवरील अन्नसाखळी आणि निसर्गातील जैवविविधता संपन्न ठेवण्यासाठी उपयुक्त असतात, अशी माहिती ग्रामस्थांना दिली.