स्थैर्य, फलटण, दि. १३ : सध्या फलटण शहरासह तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. कोरोना लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्रांवरून तोबा गर्दी होत आहे. तरी यामध्ये 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणूनच फलटण शहरासह तालुक्यांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या घरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.
फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अशोकराव जाधव यांनी ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण घरी जाऊनच करून देण्याची मागणी फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा इंन्सिंडो कमांडर डॉ. शिवाजी जगताप यांच्याकडे केलेली आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, भारतीय जनता पार्टीचे फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते, तिरंगा उद्योग समूहाचे शिल्पकार व तिरंगा फाऊंडेशनचे अध्यक्ष रणजित शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.