स्थैर्य, फलटण : कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्थेचे ठप्प झालेले चक्र आपल्याला पुन्हा गतिमान करायचे आहे. कृषी, उद्योग, आरोग्य, रोजगारस्वयंरोजगार, व्यापार, वाहतूक, पर्यटन, गुंतवणूक अशा क्षेत्रांना या महामारीचा मोठा फटका बसला आहे. परस्पर सहकार्य व सामंजस्याद्वारे या संकटावर मात करत महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर त्याच जोमाने गतिशील ठेवण्याची शपथ आजच्या दिनी आपण सर्वजण घेवूया, असे आवाहन महाराष्ट्र विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापन- दिनानिमित्त विधानभवनात आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपाध्यप नरहरी झिरवाळ, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर व देवेंद्र फडणवीस दोन्ही सभागृहातील सदस्य, विधानमंडळ सचिव राजेंद्र भागवत, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आज स्वातंत्र्यदिनाचा 74 वा वर्धापनदिन आपण कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कठीण परिस्थितीत साजरा करत असताना या महामारीने संपूर्ण जगाला अनारोग्य व आर्थिक दुरवस्थेच्या खाईत लोटले आहे. आपल्या देशाचे व महाराष्ट्राचे या विषाणू फैलावावर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. देशाची राजधानी दिल्ली, चेन्नई व आर्थिक राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी या संदर्भातील प्रयत्नांना यश प्राप्त होत आहे. मुंबईतील धारावीसारख्या दाट लोकवस्तीच्या विभागात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची जागतिक स्तरावर नोंद घेतली गेली आहे. लवकर निदान, लवकर उपचार हे या विषाणूवर विजय प्राप्त करण्याचे यशस्वी सूत्र आहे.
ट्रेस, ट्रॅक अॅण्ड ट्रीट या कार्य प्रणालीद्वारे येत्या काही आठवड्यामध्ये मृत्यूदर आणखी खाली आणण्यात यशस्वी होवू. मोठ्या लॉकडाउननंतर अनलॉक प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. जनजीवन टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येत आहे. विषाणू विरोधातील या व्यापक लढाईत थोडाही गाफीलपणा व हलगर्जीपणा आपल्याला परवडणारा नाही. मुखपट्टी, योग्य अंतर राखणे, हात सतत स्वच्छ करणे व शासन, प्रशासनाने केलेल्या अन्य सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन ना. रामराजे यांनी केले आहे.
पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून वंचितांच्या उत्थापनासाठी अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील या दृष्टीने कार्यरत राहणे गरजेचे आहे. 2022 मध्ये जेंव्हा आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करु त्यावेळी भारताला सामर्थ्यशाली व वैभवशाली बनविण्याचा आपला संकल्प सिध्दीस गेला असेल. ना. रामराजे म्हणाले.