स्व. पोलीस गजानन ननावरे यांच्या पत्नीस 10 लाखांची आर्थिक मदत
स्थैर्य, सातारा, दि. ०९ : पोलीस महासंचालक, मुंबई या कार्यालयामार्फत पोलीस जवान गजानन ननावरे यांचा कोरोनाने झालेल्या मृत्यूमुळे त्या कुटुंबावरती निर्माण झालेली गंभीर परिस्थिती सावरण्यासाठी त्या कुटुंबाला तातडीने पोलीस दलाकडून आर्थिक मदत व्हावी. त्यांच्या पत्नी व मुलीच्या मनोमन इच्छेचा विचार करून हे कुटुंब भविष्यात सावरावे या हेतूने सातारच्या जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते 10 लाख रुपयांचा धनादेश श्रीमती प्रभावती गजानन ननावरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
यावेळी भुईंज पोलीस ठाण्याचे स.पो.नि. शाम बुवा उपस्थित होते.
वाई पोलीस ठाण्याचे स्व. पोलीस जवान गजानन ननावरे यांना गेल्या महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांना तातडीने वाई येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारांना साथ देत नसल्याची माहिती वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्वी सातपुते यांना दिली. त्यांनी तातडीने पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये 1 बेडची व्यवस्था करून वाई येथून ननावरे यांना कमांड हॉस्पिटल येथे दाखल करण्याचे आदेश दिले. दरम्यानच्या काळात ननावरे यांच्या तब्येतीने डॉक्टर करत असलेल्या उपचारांना साथ न दिल्याने त्यांचा दि. 24 जुलै रोजी अचानक मृत्यू झाला व या घटनेमुळे एक पोलीस जवान गमावल्याची खंत पोलीस दलात खळबळ उडवून गेली. याचे दुःख जिल्हा पोलीसप्रमुख यांना झाले होते व मृत्यूचा अहवाल त्यांनी पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे कळविण्यात आला होता.
गजानन ननावरे यांच्या पश्चात पत्नी प्रभावती व 14 वर्षीय मुलगी आर्या यांचे पुढील आयुष्य सुरळीत व्हावे, मुलीचे शिक्षण होण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे कुटुंब उघड्यावर पडू नये व त्यांना आर्थिक चणचण भासू नये याची काळजी घेत तेजस्वी सातपुते यांनी पोलीस महासंचालकांकडे पाठपुरावा केला. या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी ही भावना डोळ्यासमोर ठेवून 10 लाख रुपयांचा धनादेश आणून स्वतः कवठे, ता. वाई या त्यांच्या माहेरघरी जाऊन स्वहस्ते ननावरे यांच्या पत्नी यांच्या स्वाधीन केला. या मिळालेला रकमेचा वापर योग्य रीतीने करून स्वतःचे व मुलीचे आयुष्य उभे करावे. तुम्हाला ज्या, ज्या वेळी अडचणी येतील त्या, त्या वेळी पोलीस कुटुंबप्रमुख म्हणून तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधावा. तुमच्या येणार्या प्रत्येक अडचणी सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे आश्वासन दिले.
त्यांनी 14 वर्षाच्या आर्या हिच्याबरोबर हितगुज साधताना तिचे सांत्वन केले. तूच खंबीर होवून आईला सावरायचे आहे, तू भविष्यात शिक्षण घेऊन काय बनणार असे विचारले असता आर्याने अश्रूंचा बांध फुटलेला असताना देखील घट्ट मानाने धाडस करून स्वत:ला सावरत मी डॉक्टर होणार. हे माझे व वडिलांचे स्वप्न होते. त्यामुळे मला डॉक्टरच व्हायचे आहे, असे तिने सुचविले. तुमच्या कुटुंबीयांच्या मागे कुटुंबप्रमुख म्हणून मी खंबीरपणे उभी आहेच, असे सांगितले.
यावेळी भुईंज पोलीस ठाण्याचे स.पो.नि. शाम बुवा यांना या कुटुंबाला वेळोवेळी भेट देवून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचे व त्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी ननावरे कुटुंबाला जलदगतीने आर्थिक 10 लाखाची मदत प्राप्त करून दिल्याबद्दल कवठे ग्रामस्थांनी जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्वी सातपुते यांचे आभार मानले.