‘गणेशोत्सवानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा!’
स्थैर्य, मुंबई, दि. २१ : श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही करतो आहोत मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात मुक्ती मिळावी तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो अशी प्रार्थना केल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला श्री गणेश आगमनाच्या पुर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.
आरोग्य आणि समाज प्रबोधनावर भर द्या
सण आणि उत्सवांची बदलेली रूपे आपण पाहिली आहेत, यातील काळानुरूप बदल आपण स्वीकारले आहेत. सामाजिक जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली, कोरोनामुळे जिथे सगळे जग हादरून गेले आहे तिथे याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, यातून एक नवे समाज प्रबोधन आपण करू आणि सामाजिक भान ठेऊन शांततेत यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करू असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नियम पाळा, गाफीलपणा नको
संपूर्ण उत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी असे आवाहन करतानाच गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत तीच पुढेही घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
गणेश मंडळांना धन्यवाद
राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी नुकतीच चर्चा करून त्यांनाही सुचना दिल्या आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आता ही वेळ नियम पाळून उत्सव साजरा करण्याची आहे. श्रीगणेशाचे आगमन असो किंवा विसर्जन असो, प्रत्येकाने कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या घरात, गल्लीत आणि कॉलनीत होणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे.
काही सार्वजनिक गणेश मंडळांनी सामजिक प्रबोधन व आरोग्य शिबिरे घेण्याचे नियोजन केले आहे, त्यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री म्हणाले की, गणेशोत्सवातून सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश हाती घ्यावा तसेच मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास अधिक सोयीचे होईल. शासनाने घालून दिलेले नियम पाळत असल्याबद्द्ल मुख्यमंत्र्यांनी या मंडळांना धन्यवाद दिले आहेत.