राजुरी, बरड भागात बिबट्याचा धुमाकूळ

पिंजरे, सी. सी. टी. व्ही. कॅमेरे लावा, पेट्रोलिंग करा : आ. दिपकराव चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 13 सप्टेंबर 2024 | फलटण | फलटणच्या पूर्व भागात राजुरी, बरड परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातल्याने ग्रामस्थ, शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले असून आ. दिपकराव चव्हाण यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना या भागात पिंजरे, सी. सी. टी. व्ही. कॅमेरे लावणे आणि वन खात्याच्या वाहनाद्वारे पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आ. दिपकराव चव्हाण यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत आज पालवेवस्ती, इंगळेवस्ती व पवारवस्ती राजुरी,बागेवाडी बरड या भागात भेटी देवून ग्रामस्थ, शेतकरी वर्गाला दिलासा दिला आहे.

दरम्यान गुरुवार व शुक्रवार असे २ दिवस बिबट्याने या भागात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. प्रथम इंगळे वस्ती राजुरी येथे पोहोचलेल्या बिबट्याने तेथील जनावरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या भागातील विविध वस्त्यांवर असलेल्या कुत्र्यांनी बिबट्याला पिटाळून लावले, त्यानंतर बिबट्याने पालवे वस्ती राजुरी येथील विठ्ठल नारायण धावडे यांच्या वस्तीवर जाऊन तेथील जनावरांवर केलेल्या हल्ल्यात एक कालवड मृत्युमुखी पडली असून एक कालवड जखमी झाली.

पवारवस्ती राजुरी येथील पोपट पवार यांच्या गोठ्यातील जनावरांवर बिबट्याने हल्ला केला, त्यामध्ये एक कालवड जखमी झाली आहे.

बागेवाडी बरड येथील धोंडीराम सदाशिव पाचांगणे यांची एक कालवड मृत्यूमुखी पडली असून एक शेळी व एक कालवड जखमी झाली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या २ दिवसात २ जर्सी कालवडी मृत्यू मुखी पडल्या असून ३ कालवडी व १ शेळी जखमी झाली आहे. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती संपूर्ण खबरदारी घेण्याचे आश्वासन ग्रामस्थ, शेतकरी यांना दिले असून सदर बिबट्या एका ठिकाणी थांबत नसल्याने आता तो या भागातून गेला असण्याची शक्यता व्यक्त करतानाच त्याचा माग काढून त्या भागात सुरक्षेची काळजी घेण्याबरोबर लोकांना माहिती देवून सतर्क करण्याचे आश्वासन वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

आ. दिपकराव चव्हाण यांच्या समवेत फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, जयकुमार इंगळे, डॉ. बाळासाहेब सांगळे, सरपंच शिवाजीराव पवार, राजेंद्र पवार, रमेश बागाव यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी होते.

ग्लोबल अर्थ फाऊंडेशनचे सचिन जाधव व मंगेश कर्वे आणि फलटण वन परिक्षेत्र फलटणचे वनक्षेत्रपाल सचिन रघतवान, परिमंडळ अधिकारी राजेंद्र आवारे, नियतक्षेत्र वन अधिकारी किरण जगदाळे व राहुल निकम उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!