
स्थैर्य, गिरवी, दि. ५ ऑक्टोबर : वारुगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गिरवी गावातील चव्हाण वस्ती येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका गाईच्या वासराचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तसेच परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जाधववाडा नजिकच्या चव्हाण वस्तीत वासराचा फडशा पाडल्याची घटना घडल्यानंतर, सुतार मळवी आणि गिरवी शिवारातही बिबट्या दिवसाढवळ्या फिरताना दिसत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर, गिरवी ग्रामपंचायत आणि ग्राम सुरक्षा यंत्रणेने तातडीने नागरिकांना भ्रमणध्वनीवरून सतर्कतेचे संदेश पाठवले आहेत. या हल्ल्यामुळे दुग्ध आणि कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये विशेष घबराट पसरली आहे.
या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी गिरवी ग्रामपंचायतीतर्फे उद्या, सोमवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी तहसीलदार आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लेखी निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवकांनी दिली आहे.
शेतकऱ्यांकडून दिवसा वीजपुरवठ्याची मागणी
रात्रीच्या वेळी शेतात पाण्याच्या पाळ्या देण्यासाठी जाणे जीवघेणे ठरू शकते, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परिसरात बिबट्यांबरोबरच तरस आणि रानडुकरांचाही सुळसुळाट झाला असून, त्यांच्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागाने या सर्व वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

