भरतगाववाडीत आढळले बिबट्याचे ठसे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२२ । सातारा । काही दिवसांपूर्वीच सातारा तालुक्यातील भरतगाव येथे महामार्गालगतच बिबट्याने दर्शन देण्याची घटना घडली असतानाच सोमवारी पुन्हा भरतगाववाडी (ता.सातारा) येथे एका शिवारात बिबट्याचे ठसे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सातारा वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पहाणी केली आहे.
भरतगाववाडी, गावच्या हद्दीतील दयानंद पवार यांच्या रोमन नावाच्या शिवारात सोमवारी सकाळी श्रीकांत मोहिते, प्रज्वल पवार, प्रणव काटकर या युवकांना बिबट्याचे ठसे आढळून आले. याची त्यांनी सातारा वनविभागाला माहिती दिली. यावेळी वन विभागाचे वनपाल कुशल पावरा, वनरक्षक राज मोसलगी, महेश सोनवले यांनी परिसरात पाहणी केली असता सदरचे ठसे हे नर जातीचे बिबट्याचेच असल्याचे स्पष्ट झाले. याची माहिती त्यांनी वरिष्ठांना तात्काळ दिली.
काही दिवसांपूर्वीच भरतगाव येथे महामार्गालगतच्या शिवारात बिबट्याचे दर्शन काही युवकांना झाले होते आणि आता भरतगाववाडीत शिवारात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आल्याने या दोन्ही गावच्या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने स्पष्ट झाले आहे. सध्या शिवारातून शेतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने ग्रामस्थ राना-शिवारात जात आहेत. त्यातच बिबट्याचा वावर असल्याची माहिती समजल्यावर दोन्ही गावच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
वनविभागाचे ग्रामस्थांना आवाहन.
दोन्ही गावच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून नागरिकांनी एकट्या-दुकट्याने शिवारात जाऊ नये. तसेच लहान मुलांना एकटे शिवारात पाठवू नये .महिलांनीसुद्धा एकत्रितच रानात जावे. जर दोन ते तीन दिवसानंतर पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले तर शिवारात ट्रॅप कॅमेरा बसविण्यात येईल आणि त्यावर शिवारात बिबट्याचे आगमन अथवा पाऊलखुणा आढळून आल्यास पिंजऱ्याची सोय करण्यात येईल असे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!