
दैनिक स्थैर्य | दि. २७ नोव्हेंबर २०२३ | सातारा |
संविधान दिनाचे औचित्य साधत २६ नोव्हेंबरला निर्माण बहुउदेशीय विकास संस्था व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विधी स्वयंसेवक प्रशिक्षणासाठी सातारा, वाई व जावळी तालुक्यातील विविध गावातील ५० स्वयंसेवक उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे तृप्ती जाधव (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण), पीएसआय चांदणी मोटे (सातारा शहर पोलिस स्टेशन), सुजाता देशमुख (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी) हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
प्रशिक्षणाची सुरूवात संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन करून करण्यात आली. सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मुख्य प्रशिक्षक व वक्ते म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे अॅड. आकाश महांगडे, अॅड. सूचिता पाटील, अॅड. आशिष राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षक व वक्ते यांनी विधी स्वयंसेवक यांची भूमिका व जबाबदारी याबद्दल मार्गदर्शन केले. अॅड. सूचिता पाटील यांनी संविधान दिन व इतिहास याबद्दल उपस्थितांना संबोधन केले. अॅड. आकाश महांगडे यांनी पोस्को कायदा व कायद्यातील तरतुदी याबद्दल प्रभावीपणे मार्गदर्शन केले व अॅड. आशिष राठोड यांनी विधी स्वयंसेवक यांच्या जबाबदार्या व कर्तव्ये याबद्दल माहिती दिली. महिला सक्षमीकरण संदर्भातील गाणी गाऊन महिलांना प्रोत्साहन देण्यात आले व कार्यक्रमाची सांगता शपथ घेऊन करण्यात आली.
प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रस्तावना सायली पडवळ व सूत्रसंचालन काजल गायकवाड यांनी केले. तसेच आभार विक्रांत मोरे यांनी मानले. निर्माण बहुउद्देशीय विकास संस्थेचे रमेश पुजारी, सूचिता सातपुते, नम्रता खरात, चांदणी चंदनशीवे, विद्या गडकरी व पायल चव्हाण सदर प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.