
दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२२ । सातारा । जिल्हा विधी प्राधिकरण, सातारा यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा कारागृह येथे कारागृहातील बंदयांसाठी दिवाणी न्यायाधीश एस. एस. दहातोंडे यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
यावेळी न्यायाधीश तथा शिबिराचे अध्यक्ष एस. एस. दहातोंडे यांनी बंदीना कायदेविषयक मार्गदर्शन केले. तसेच कारागृह अधीक्षक श्री शामकांत शेडगे यांनी देखील कारागृहातील बंदीना हक्क व अधिकार याच्यापूर्वी कर्तव्य हे श्रेष्ठ असते. त्या कर्तव्यातूनच कारागृहातील वर्तन स्वच्छ ठेवल्यास बंदींना कारागृहबाहेर जाण्याचे मार्ग लवकरात लवकर मोकळे होतील, याबाबत मार्गदर्शन केले. तर जिल्हा विधी सेवाच्या पॅनलवरील ॲड. शरद जांभळे हे उपस्थित होते. त्यांनी कारागृहातील बंदींना कायद्याने काय काय अधिकार दिले आहेत, याची माहिती दिली. तसेच त्यांचे हक्क व कायदेशीर तडजोडीनुसार असलेल्या गुन्हयातून लवकरात लवकर केस संपवून कारागृहाबाहेर येण्याचे मार्ग कसे आहेत, याबाबत मार्गदर्शन करून जमिनीच्या तरतुदींची देखील माहिती कारागृहातील सर्व बंदिना दिली.
या कार्यक्रमास ॲड. जांभळे, लघुलेखक दिलीप भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर दुबे तसेच इतर बंदी व कर्मचारी उपस्थित होते.