दैनिक स्थैर्य । दि. ११ नोव्हेंबर २०२२ । सातारा । जपानी भाषा ही मराठी भाषेशी संवादी असलेली भाषा असून प्रयत्न आणि सरावाने ती कोणासही शिकता येईल. जपान ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक शक्ती असून या देशात व्यावसायिक जगतात अजूनही मनुष्यबळ कमतरता जाणवते. अशावेळी भारतीय माणसांनी ही भाषा शिकल्यास भारतातील जपानी कंपन्यात,जगभरातील जपानी कंपन्यात व जपानमध्ये नोकरी मिळण्याची शाश्वती आहे. या संधीचा फायदा आपल्या माणसांनी घ्यायला हवा. जपानची शिस्त,संस्कृती,उद्यमशीलता,प्रामाणिकपणा हे वाखाणण्यासारखे आहेत. जपानमध्ये कार्यसंस्कृती रुजलेली आहे. जगात स्वतःचे स्थान व आदर त्यांनी आपल्या कार्यशैलीने तयार केलेला आहे. जगात इतर देशापेक्षा पगार देखील इथे चांगला मिळत असतो. जपानी माणसे वेळेला फार महत्व देतात. कोणतेही काम करताना वक्तशीर राहणे वेळ पाळणे हे आवश्यक आहे. जपानमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी आहेत मात्र जपानी भाषा शिकण्याचा ध्यास घेऊन भाषिक कौशल्ये व व्यावसायिक,सांस्कृतिक ज्ञान संपादन करायलाच हवे असे मत स्टेप अप करिअर अकादमीच्या प्रमुख सुजाता कोळेकर यांनी व्यक्त केले. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी दिनी रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभागाने जपानी भाषा ऑनलाईन कोर्स सुरु केला.त्याचे उद्घाटन करताना त्या सुजाता कोळेकर बोलत होत्या. यावेळी मार्गदर्शक शिक्षिका गौरी ननावरे याही उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाने जपानी भाषा ऑनलाईन कोर्स मराठी विभागाने सुरु केला असून मराठी अभ्यास मंडळाने देखील हा कोर्स सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे मराठी विभाग प्रमुख व कोर्सचे समन्वयक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी सांगितले.
गौरी ननावरे यांनी जपानी भाषा फौंडेशन घेत असलेल्या जपानी भाषा क्षमता चाचणी परीक्षांची यावेळी माहिती दिली. तसेच NAT ही परीक्षा जपानमधील खाजगी संस्था कशी घेते तेही सांगितले. हिरागाना ही जपानी माणसांची मूळ बोली लिपी असून ती त्या देशात मोठ्या प्रमाणात वापरली जाते ,तसेच काताकाना ही जपानी बोली ही परदेशीय संवाद व्यवहारासाठी वापरली जात असून जपानची कांजी ही चित्रलिपी असल्याचे त्यांनी सांगितले. कोणतीही भाषा शिकत असताना जिज्ञासा महत्वाची असून त्या भाषेची मुळे नीट समजून घ्यावीत .भाषेतील स्वर ,व्यंजने ,वर्णमाला व व्याकरण हे महत्वाचे भाग असून पुढे भाषेचे संदर्भानुसार उपयोजन कसे करतात त्याच्या पद्धती समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जपान हा त्यांच्या स्वतःच्या भाषेवर प्रेम करणारा देश आहे. जपानमधील बुद्धिझम व शिंतोझम या दोन संस्कृतीची माहितीही त्यांनी दिली. साकुरा ,माउंट फुजी ,तसेच जपानी भाषेवर असलेला चीन आणि कोरियन भाषांचा प्रभाव याबद्दलही त्यांनी विवेचन केले.छत्रपती शिवाजी कॉलेजने ग्रामीण परिसरात जपानी भाषेचा प्रसार करून करिअरच्या संधी निर्माण करून देण्यासाठी हा कोर्स सुरु केल्याबद्दल त्यांनी कॉलेजविषयी आत्मीयता व्यक्त केली आणि जपानी भाषेचे वर्तमानकालीन महत्व सर्वत्र प्रसारण करावे असे आवाहनही केले. या कोर्स मध्ये कॉलेज विद्यार्थी सह महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून विद्यार्थी सहभागी झाले असल्याचे सांगून सर्वांचे प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी स्वागत केले व आभार मानले.