दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । फलटण । राज्यात आपल्या धडाकेबाज कर्तृत्त्वाने आणि गतिमान नेतृत्त्वाने ज्यांचा विकास कामात वचक आहे व अधिकार्यांच्यावर धाक आहे अशा नेते मंडळीत अजितदादा पवार यांचा नेहमीच वरचा क्रमांक लागतो. सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री म्हणून व त्याआधीही विविध खात्यांचे राज्यमंत्री, कॅबिनेटमंत्री म्हणूनही दादांनी यशस्वीपणे काम केले आहे.
अजित पवार या दोन शब्दातच एक जादू आहे. कार्यकर्त्यांच्या गर्दीतला दर्दी ‘नेता’ म्हणून त्यांचा लौकीक आहे. आपल्या समोर आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे काम ते मनापासून करीत असतात. काही वेळेला हे काम होणार नसेल तर ते स्पष्टपणाने नाही म्हणतात. याचे कारण असे की, कार्यकर्त्यांना खोट्या आशेमध्ये झुलवत ठेवणे त्यांना आवडत नाही. म्हणून काही वेळेला काही लोक त्यांच्यावर नाराज होतात. पण ही नाराजी तेवढ्यापुरतीच असते. आणि पुन्हा ज्या प्रमाणे लोखंड लोहचुंबकाकडे आकर्षित होते त्याप्रमाणे कार्यकर्तेही दादांच्याकडे आकर्षित होतात. कार्यकर्ते ही दादांची शक्ती आहे. कार्यकर्त्यांचे पाठबळ, प्रशासनावर उत्तम पकड, कार्यकर्त्यांचे आश्रयस्थान, प्रबळ राजकीय इच्छाशक्ती, प्रत्येक कृतीत ठाम विचार, निश्चित भूमिका, सुयोग्य नियोजन, आणि बोले तैसा चालणारा शब्दांचा पक्का अशी अजितदादांची प्रतिमा आहे. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचे मोहोळ नेहमी त्यांच्या भोवती असते. कधीकधी त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे व निर्णयामुळे ते वादग्रस्तही होतात परंतु घेतला निर्णय बदलायचा नाही हाही त्यांचा ठाम स्वभाव असतो. महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राची उद्याची दिशा म्हणून निश्चितपणे अजितदादांचे नाव अग्रभागी आहे ते यामुळेच.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व कृषिमंत्री ज्येष्ठ नेते खा.शरदराव पवार यांचे ते पुतणे असले आणि पवार घराण्याचा वारसा नात्याने व कार्याने त्यांच्याकडे आला असला तरी त्यांनी स्वत:ची अशी एक प्रतिमा वरीलप्रमाणे आपल्या कार्याने निर्माण केली आहे. त्यामुळेही कार्यकर्त्यांचे ते एक आकर्षण आहेत. सामान्य कार्यकर्ता म्हणूनच त्यांनी पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखाली बारामती परिसरात सुरुवातीला काम सुरु केले आणि आज या कार्याचा वटवृक्ष झालेला आहे. सन 1991 ते 1995 या कालावधीत त्यांनी लोकसभा सदस्य म्हणून राजकारणातील दमदार कार्याला सुरुवात केली. त्यानंतर सन 1995 पासून पुढे आज अखेर सलग 6 विधानसभा निवडणूकीत बारामती मतदार संघातून विजयी होवून ते विधानसभेचे सदस्य म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. या काळात 1991 – 92 मध्ये कृषी, फलोत्पादन व ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री, 1992 – 93 मध्ये जलसंधारण, ऊर्जा व नियोजन खात्याचे राज्यमंत्री, 1999 ते 2003 मध्ये पाटबंधारे, फलोत्पादन खात्याचे कॅबिनेट मंत्री, 2003 ते 2004 या कालावधीत ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे खात्याचे मंत्री, सन 2004 ते 2009 जलसंपदा लाभक्षेत्र विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री, 2009 ते 2010 मध्ये जलसंपदा व ऊर्जा खात्याचे मंत्री, 2010 ते 2014 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच वित्त व नियोजन आणि ऊर्जा मंत्री आणि आता पुन्हा सन 2019 पासून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री म्हणून ते यशस्वीपणे महाराष्ट्र राज्याची धुरा सांभाळीत आहेत.
दादांच्या कामाचा, त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा डोंगर प्रचंड मोठा आहे. कोवीडच्या कठीण काळात राज्याला सावरण्याचे काम त्यांनी मोठ्या कुशलतेने केले आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील व पवारसाहेब यांनी दिलेल्या दिशेने महाराष्ट्र अधिक गतिमान व प्रगतीशील करण्यासाठी दादा नुसते आग्रही नाहीत तर त्यासाठी अफाट जनसंपर्क करुन ते कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करत आहेत. पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर पुण्याचे स्वरुप बदलले. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका ताब्यात घेतल्यावर तेथेही सामान्य नागरिकांनासुद्धा कारभारी बदलल्यामुळे झालेल्या नव्या प्रगतीची जाणीव झाली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात जर अशीच प्रगती व्हायची असेल तर महाराष्ट्राचे कारभारीपण दादांच्याकडे येणे ही काळाची गरज आहे; आणि आज ना उद्या हे होणारच आहे. त्यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त (22 जुलै) ही अपेक्षापूर्ती लौकर व्हावी ही शुभेच्छा !
रविंद्र बेडकिहाळ,
ज्येष्ठ पत्रकार तथा संस्थापक व अध्यक्ष, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण.