स्थैर्य, मुंबई, दि.१७: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब
ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. शिवसैनिक व महाराष्ट्रातील नेते शिवाजी
पार्क येथील स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत होते.
तर, काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही बाळासाहेबांना श्रद्धांजली
वाहिली आहे. सकाळपासून शिवसैनिकांसह अनेक राजकीय नेत्यांची शिवतीर्थावर रिघ
लागली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचे नियम पाळत अभिवादन
करण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले होते.
आज
सकाळी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब
शिवतीर्थावर येत बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत
पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे
यांची उपस्थिती होती. यासोबतच सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन
भुजबळ, शिवसेना नेते संजय राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनीही
शिवतीर्थावर येत अभिवादन केले.
माजी
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर येथ
बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले. यासोबतच विधानपरीषदेचे विरोधीपक्ष नेते
प्रविण दरेकर यांनीही शिवतीर्थावर येत बाळासाहेबांना अभिवादन केले आहे.
भाजपचे नेते दरवर्षी शिवतीर्थावर येत बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करतात.
मुंबईतील सर्वच पक्षातील नेते बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी
शिवतीर्थावर येतात.
यावर्षीही
शक्तिस्थळी उपस्थित राहत राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी
शिवसेनाप्रमुखांना मानवंदना दिली. शिवसेना नेते मनोहर जोशी, खासदार संजय
राऊत, माजी मंत्री दिवाकर रावते, रामदास कदम, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे,
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, अन्न व नागरी
पुरवठामंत्री छगन भुजबळ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, परिवहनमंत्री अनिल
परब, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिवसेना उपनेते अरविंद सावंत, भाजप
नेते माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री
अब्दुल सत्तार, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई,
सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, काँग्रेस नेते आमदार
भाई जगताप, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार अजय चौधरी, प्रताप सरनाईक, संजय
शिरसाट, रवींद्र फाटक, भाजप आमदार मंगलप्रभात लोढा, निरंजन डावखरे,
स्थापत्य समिती अध्यक्षा श्रद्धा जाधव आदींनी शिवतीर्थावरील शक्तिस्थळी
शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुखांना अभिवादन
ज्येष्ठ
नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरद्वारे
शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केले आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे
यांचे अमोघ वक्ता, व्यंगचित्रकार व राजकीय भाष्यकार म्हणून कार्यकर्तृत्वही
विशेष महत्त्वाचे होते. राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजिगीषु
वृत्तीचे प्रकर्षाने स्मरण करणे क्रमप्राप्त आहे. पुण्यतिथी दिनी स्व.
बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन! अशा शब्दांत त्यांनी
शिवसेनाप्रमुखांना मानवंदना दिली. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते देवेंद्र
फडणवीस यांनीही आमचे हृदयस्थान, मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत
हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी
कोटी कोटी अभिवादन असे ट्विट केले. राजकीय तसेच सामजिक क्षेत्रातील
मान्यवरांबरोबरच सर्वसामान्यांनीही फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून
शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली.