दैनिक स्थैर्य । दि. २९ जुलै २०२२ । फलटण । सातारा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर (नेते) यांचे फलटणमध्ये लोहार समाजासाठी स्वतंत्र असे लोहार समाज भवन असावे, असे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरत आहे, अशी भावना जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य ॲड. सौ जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केल्या.
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्थानिक विकास निधीतून मलठण येथे लोहार समाजासाठी लोहार भवन उभारले जात आहे. त्याच्या भूमीपूजन प्रसंगी ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होत्या. यावेळी युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, सौ. मिना नेवसे, राजाभाऊ नागटिळे, बबनराव बोके, देविदास पवार, सागर लंभाते यांची उपस्थिती होती.
माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी लोहार समाज भवनाच्या आराखड्याबाबत माहिती दिली.
लोहार समाज भवन उभारत असल्याने लोहार समाज हा कायमच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभा राहील, असे मत फलटण तालुका लोहार समाज सेवाभावी संस्थांचे सचिव अतुल पवार यांनी व्यक्त केले.