दैनिक स्थैर्य । दि. १३ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी यंदा सुद्धा यशाची परंपरा कायम राखत सर्वाधिक पदांची कमाई करत स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राच्या टीममधील प्रत्येक खेळाडूंनी खेलो इंडिया स्पर्धेत जिगरबाज खेळ करत पदकांबरोबरच देशातील क्रीडा रसिकांची मने जिंकली आहेत. यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेत अव्वल स्थान मिळवत महाराष्ट्राने आपला दबदबा कायम राखला. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 56 सुवर्णपदकांसह 161 पदकांची कमाई करत क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राची मान उंचावली आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, मध्यप्रदेश येथे पार पडलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेच्या शेवटच्या दिवसापर्यंत महाराष्ट्राची टीम अव्वल स्थानी राहिली. महाराष्ट्राच्या प्रत्येक खेळाडूंनी शानदार प्रदर्शन केले. महाराष्ट्राच्या टीमने अंतिम पदक तालिकेत 56 सुवर्ण 55 रौप्य आणि 50 कांस्य पदकांसह एकूण 161 पदकांची कमाई करत क्रीडा रसिकांची मने सुध्दा जिंकली. राज्यातील प्रत्येकाला आपल्या खेळाडूंच्या कामगिरीचा अभिमान आहे. या यशासाठी स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि व्यवस्थापकांसह त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या पालकांचे सुध्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.