स्थैर्य, सातारा, दि. 31 : स्थानिक गुन्हे शाखेने धोम (ता.वाई) गावचे हद्दीत कृष्णा नदी पात्रात छापा टाकून सुरु असलेल्या वाळू उत्खनन व चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी करवाई केली. यामध्ये एका जेसीबी व डंपर असा 25 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ह्दय लोकनाथ कश्यप (वय 24, रा. सह्याद्रीनगर, वाई, जि. सातारा) व दिगंबर नारायण पवार (वय 21, रा. बावधन ता. वाई) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यांच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना धोम (ता. वाई) गावचे हद्दीत कृष्णा नदीचे पात्रात एका जे.सी.बी.च्या सहाय्याने वाळूचे उत्खनन करुन डंपरमध्ये चोरटी वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. 30 रोजी मध्यरात्री धोम गावचे हद्दीत कृष्णा नदी पात्रात छापा टाकला असता, तेथे एका जे.सी.बी.च्या सहाय्याने वाळुचे उत्खनन करुन डंपरमध्ये चोरटी वाहतूक करत असताना मिळून आला. याप्रकरणी ह्दय लोकनाथ कश्यप व दिगंबर नारायण पवार यांना जागीच ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक विना नंबरचा जे.सी.बी. व टाटा डंपर (एम. एच. 11 सी. जे. 7372) व डंपरमध्ये भरलेली चार ब्रास वाळू असा एकूण 25 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयितांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहाय्यक फौजदार विलास नागे, आनंदराव भोईटे, मोहन नाचन, संतोष जाधव, गणेश कापरे, वैभव सावंत, गणेश कचरे, विजय सावंत यांनी सहभाग घेतला.