स्थैर्य, सातारा, दि. १५ : गेल्या 17 वर्षांपासून काहीही संबंध नसताना 10 हजार भाडे जबरदस्तीने वसूल करणाऱ्या माजी आमदार लक्ष्मण माने, ऍड. गौरी घरत यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच तक्रार देवूनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या हवालदार अनिल सावंतवर कारवाई करावी या मागणीसाठी गायकवाड दांपत्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनास महाराष्ट्र राज्य फकिरा बिग्रेडचे संस्थापक उमेश चव्हाण यांनी पाठिंबा दिला आहे.
आरती विनोद गायकवाड व विनोद गायकवाड जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दाभोळकर व झिंब्रे यांच्या एकता शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून आम्ही सिव्हील हॉस्पिटल परिसरात सिध्दार्थ टी स्टॉलचा व्यवसाय करत आहोत. मात्र या संस्थेशी कोणताही संबंध नसताना ऍड. गौरी घरत आमच्याकडून महिना 10 हजार रुपये भाडे घेत होत्या. न दिल्यास शिवीगाळ, दमदाटी करुन हॉटेलला कुलूपही लावत होत्या.
याबाबत आम्ही सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सावंत यांनी तक्रारीची दखल घेतली नाही. आमच्यावर अन्याय करणाऱ्या लक्ष्मण माने व ऍड. घरत यांना पाठिशी घालत आम्हालाच पोलीस ठाण्यातून बाहेर जाण्यास सांगितले. गेली अनेक वर्षे आमची फसवणूक करुन आमच्याकडून दहशतीने भाडे वसूल करणाऱया माने व ऍड. घरत यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच तक्रारीची दखल न घेणाऱ्या हवालदार सावंत यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. दरम्यान, या आंदोलनास फक्रिरा बिग्रेडने पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी उमेश चव्हाण यांनी पोलीस प्रशासनाने न्याय न दिल्यास आम्ही ग्रामीण गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना भेटून सर्व पुरावे सादर करणार असून एवढी वर्षे दहशतीखाली जगत असलेल्या कुटुंबाला न्याय देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनात आरती गायकवाड, विनोद गायकवाड, विकास साळुंखे, सारिका वायदंडे, सुजाता गायकवाड यांनी सहभाग घेतला होता.