
थेट WhatsApp वर मिळवा
बार कौन्सिल ऑफ इंडियाने कायद्याच्या अभ्यासक्रमांमधील प्रवेशासाठी असलेली कमाल वयोमर्यादा पूर्णपणे मागे घेतली असून, सुप्रीम कोर्टात याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १० नोव्हेंबर : कायद्याचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाने (BCI) विविध लॉ कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी लागू असलेली कमाल वयोमर्यादा अधिकृतपणे रद्द केली आहे. यासंदर्भातील ठराव कौन्सिलने मंजूर केला असून, सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान याबाबतची माहिती अधिकृतपणे सादर करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टात दाखल याचिका आणि सुनावणी
ऋषभ दुग्गल व इतर विरुद्ध बार कौन्सिल ऑफ इंडिया या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर बीसीआयच्या वकिलांनी वयाचे सर्व निर्बंध मागे घेतल्याची माहिती दिली. याआधी बीसीआयच्या नियमांनुसार ५ वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमासाठी २० वर्षे तर ३ वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमासाठी ३० वर्षांची कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली होती. या निर्णयामुळे वयाची अट पूर्ण न करू शकणाऱ्या अनेक इच्छुकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. आता हा नियम रद्द झाल्यामुळे वयाची कोणतीही अट न राहता विद्यार्थ्यांना कायद्याचे उच्च शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.





