दैनिक स्थैर्य । दि. ९ जुलै २०२१ । फलटण । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते व फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक स्व. विनायकराव पाटील यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनाने फलटण तालुक्याच्या पूर्व भागामध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे. स्व. विनायकराव पाटील हे कायमच समाजातील सर्वसामान्य जनतेसाठी तळमळीने कार्य करीत असत, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक स्व. विनायकराव पाटील यांच्या स्मरणार्थ आंदरुड, ता. फलटण येथे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्या वेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान सदस्य पांडुरंग गुंजवटे, स्व. विनायकराव पाटील यांचे मोठे बंधू भागवतराव पाटील, त्यांची आई, पत्नी व मुले यांच्यासह आंदरुड ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.