
स्थैर्य, 7 मार्च, सातारा : युनायटेड वेस्टर्न बँकेने बँकेचे संस्थापक कै. वा. ग. चिरमुले यांचे स्मरणार्थ स्थापन केलेल्या वा.ग. तथा अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्ट’ तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात अमूल्य सेवा देणार्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. सन्मानचिन्ह व रु. एक लाख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या वर्षी ट्रस्टने पद्मभूषण दिवंगत माधवराव धनंजयराव गाडगीळ यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्याचे योजिले आहे. कै. गाडगीळ हे भारतीय पर्यावरणशास्त्रज्ञ, लेखक आणि पर्यावरण विज्ञान केंद्राचे संस्थापक होते. त्यांनी लोकसंख्या जीवशास्त्र, संवर्धन जीवशास्त्र, मानवी पर्यावरणशास्त्र आणि पर्यावरणीय इतिहास या क्षेत्रात व्यापक संशोधन केले होते. भारतात पर्यावरणशास्त्र आणि प्राण्यांच्या वर्तनाच्या परिमाणात्मक तपासणीची ओळख करून देण्याचे आणि मानवांना परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून समाविष्ट करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. 1980 च्या दशकातील त्यांच्या सुरुवातीच्या संशोधनांमुळे भारतातील पहिले जैवमंडळ राखीव म्हणून निलगिरीची ओळख पटवण्यात मदत झाली आहे. जैविक विविधता कायदा 2002 च्या तयारीतही त्यांचा मोलाचा हातभार आहे. पश्चिम घाटाचे संशोधन करून शासनाला घाटातील पर्यावरण रक्षण करण्यासाठी मार्गदर्शन केले. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवले होते.
या क्षेत्रातील त्यांच्या प्रशंसनीय योगदानाचे कौतुक करण्यासाठी आणि कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी त्यांना मरणोत्तर 2025 चा ’चिरमुले पुरस्कार’ देण्याचा विश्वस्तांनी एकमताने निर्णय घेतला आहे.
चिरमुले ट्रस्टने यापूर्वी डॉ. कै. मनमोहन सिंग, डॉ.श्री. विजय भटकर, डॉ. अनिल काकोडकर, कै. रतन टाटा, कै. राहुल बजाज, डॉ.सी. रंगराजन, श0श्री. गुलजार, डॉ. सायरस पूनावाला, डॉ. राजेंद्रसिंह, डॉ. हिम्मतराव बावस्कर, नाम फौंडेशन आदि आदरणीय व्यक्ति व संस्थांना या पुरस्काराने गौरविले आहे.
पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम लवकरच आयोजित केला जाईल अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त दिलीप पाठक, डॉ. अनिल पाटील, डॉ. अच्युत गोडबोले, श्री. समीर जोशी यांनी दिली आहे.
