
स्थैर्य, गोखळी, दि. 31 ऑगस्ट : फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, ‘दैनिक ऐक्य’चे वार्ताहर आणि एक निस्वार्थ समाजसेवक, श्री. राजेंद्र दिनकर भागवत (वय ५९) यांचे आज, शनिवारी सकाळी बारामती येथे एका अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गोखळीसह फलटण तालुक्याच्या पूर्व भागावर शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी गोखळी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत श्री. राजेंद्र भागवत यांनी आपल्या पत्रकारितेचा आणि समाजसेवेचा वसा जपला. स्वतः कष्ट करून त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. आज त्यांचा एक मुलगा सहाय्यक पोलीस निरीक्षक, दुसरा पोलीस हवालदार, तर तिसरा एसटी महामंडळात वाहक म्हणून शासकीय सेवेत कार्यरत आहे. कौटुंबिक परिस्थिती स्थिरावत असताना आणि निवृत्तीनंतरचे आयुष्य समाजसेवेसाठी देण्याचे स्वप्न पाहत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
एक पत्रकार म्हणून त्यांनी गोखळी आणि परिसरातील सर्वसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. रस्ते, शासकीय योजना, शेतकऱ्यांच्या अडचणी किंवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे असोत, ते केवळ वृत्तपत्रातून आवाज उठवून थांबले नाहीत, तर निवेदने, आंदोलने आणि उपोषणांच्या माध्यमातूनही त्यांनी प्रशासनाला जागे केले. अनेक गुणवंत परंतु गरीब विद्यार्थ्यांना दानशूर व्यक्तींकडून मदत मिळवून देण्यातही ते नेहमीच अग्रभागी राहिले.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यांतून त्यांचे मित्र, आप्तेष्ट आणि चाहते गोखळी येथे मोठ्या संख्येने दाखल झाले होते. त्यांच्या जाण्याने फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील एक हक्काचा आधारस्तंभ आणि सर्वसामान्यांचा आवाज हरपला आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.