स्थैर्य, सातारा, दि. ०२ : वाढे, खेड, संगमनगर, कोडोली औद्योगिक वसाहत हद्दीतून जाणारा कण्हेर कालवा वर्षानुवर्षे कचर्यामध्ये चिंब भिजत असल्यामुळे त्याचा शेतीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. कचर्याचे विघटन होऊन रसायनयुक्त पाणी शेतीला मिळत असल्यामुळे पर्यायाने शेतकर्यांना आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे. हे काही नैसर्गिक संकट नाही. मानवनिर्मित संकटामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
कण्हेर धरण बांधल्यानंतर धरणाच्या खाली असणार्या गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कण्हेर कॅनॉलची निर्मिती करण्यात आली आहे. कण्हेर धरणाचे पाणी शेतीला मिळू लागल्यामुळे शेतकर्यांनी ऊस, आले, हळद, पालेभाज्या, बटाटा, वांगी, टोमॅटो यासारखी नगदी पिके घेण्यास सुरुवात केली. उत्पन्न घेतलेल्या पालेभाज्या, तरकारी थेट पुणे येथील गुलटेकडी येथील मार्केटमध्ये पाठवण्यात येत असल्यामुळे त्या ठिकाणी शेतकर्यांच्या मालाला चांगला दर मिळू लागला. पर्यायाने शेतकर्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास कण्हेर कॅनॉलचा फार मोठा हातभार समजला जातो. त्या माध्यमातून अनेक शेतकरी सधन झाले. नवीन घर, दारात नवीन गाडी, नवीन ट्रॅक्टर, मुलांना उच्च शिक्षण, मुलींची लग्नं ही स्वप्न सहज साकार होऊ लागली.
गेल्या दहा वर्षांपर्यंत सर्व काही आलबेल होते. कण्हेर कॅनॉल बांधून अनेक वर्षे होऊनही त्याची साफसफाई होत नव्हती. गवत उगवून येणे, छोटी झाडे उगवणे हे प्रकार सर्रास घडत होते. जलसंपदा विभागाकडे निधीची वानवा असल्यामुळे अधिकार्यांनीही कॅनॉलची साफसफाई करण्याकडे दुर्लक्ष केले. कॅनॉलला कोणीही वाली नसल्याचे पाहून हळूहळू या कॅनॉलमध्ये घरातील कचरा, प्लास्टिकच्या मोकळ्या पिशव्या, वापरून कालबाह्य झालेले साहित्य टाकण्यात येऊ लागले. कालांतराने त्याला व्यापक स्वरूप प्राप्त होऊ लागले. तदनंतर कॅनॉलच्या कडेला कपडे धुणे, पाळीव जनावरे धुणे असे प्रकार सुरू झाले. गेल्या पाच वर्षात कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येऊ लागल्यामुळे धरणातून सोडण्यात येणारे पाणी दूषित होऊ लागले. धरणातील पाणी बंद केल्यानंतर कॅनॉलमध्ये ठिकठिकाणी पाण्याची डबकी, त्यावर तरंगत असलेले शेवाळं आणि कचरा पहायला मिळू लागला.
साचलेल्या पाण्यात कचर्याचे विघटन होऊन त्यातील रसायन पाण्यात उतरू लागली. रसायनांचे तरंगच्या तरंग कण्हेर कॅनॉलमध्ये पाहायला मिळत आहेत. धरणातून पाणी सोडल्यानंतर शेतकरी या कॅनॉलच्या पोटकालव्यातून शेतीला पाणी देऊ लागला. रसायनांचा अंश पाण्यात उतरल्यामुळे त्याचा उगवण क्षमतेवर फार मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ लागला. उगवलेली रोपे जळू लागली. जी रोपे वाचली, त्याला अल्प प्रमाणात उत्पन्न येऊ लागले. वांग्यावर, पावट्यावर तांबडा रोग पडणे यासारखे प्रकार घडू लागले. या रसायनयुक्त पाण्यामुळे उसाच्या टनावर, हळद, आले, भाजीपाला यांच्या उत्पन्नावर दुष्परिणाम होऊ लागला. कण्हेर कॅनॉलमध्ये मानवनिर्मित कचरा पडू लागल्यामुळे शेती उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम जाणवू लागल्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक कंबरडे मोडू लागले आहे.
शेतीच्या पाण्यामध्ये अशा प्रकारचा कचरा टाकणार्या कोणत्याही व्यक्तींवर संबंधित गावची ग्रामपंचायत अथवा जलसंपदा विभागाकडून कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे ज्या हद्दीतून अशाप्रकारचा कॅनॉल जात आहे त्या ठिकाणी कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्याची मानसिकता वाढू लागली आहे. जाब विचारणारे कोणीच नसल्यामुळे दिवसाढवळ्या कचर्याच्या कॅरीबॅग कॅनॉलमध्ये पडू लागल्यामुळे एकेकाळी शेतीला पाणीपुरवठा करणारे कॅनॉल आज कचरा वाहून नेण्याचे काम करत आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.कण्हेर कॅनॉल ज्या परिसरातून जातो त्या परिसरातील ग्रामपंचायतीने कचरा उचलण्याची व्यवस्था नियोजनबद्ध न केल्यामुळेच आज अशा प्रकारचे कॅनॉल कचर्याच्या कुंड्या होऊ लागले आहेत. ज्या ग्रामपंचायतींनी कचरा वेळेवर उचलण्यास टाळाटाळ करण्याची भूमिका घेतली आहे अशा ग्रामपंचायतींवर जलसंपदा विभागाने पुढाकार घेऊन कारवाई केल्यास कॅनॉलच्या कडेला असणारी शेती पुन्हा एकदा सुजलाम, सुफलाम होण्यास मदत होईल.