स्थैर्य, सातारा, दि. 23 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने सर्व प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तब्बल 62 दिवसानंतर गरीबांचा रथ म्हणून ओळखली जाणारी एसटी बस सातारा जिल्ह्यात विविध मार्गावर धावली. एसटी ठिकठिकाणी धावली असली तरी काही ठिकाणी मोकळ्या तर काही तुरळक प्रवासी घेवूनच मार्गस्थ झाल्या. मात्र, प्रवाशांनी कोरोनाचा धसका घेतल्याचेच चित्र दिसून आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागल्याने सर्वत्र संचारबंदी होती. त्यामुळे नागरिकही घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. तसेच राज्य शासनाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्वत्र एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे सातारा विभागातील सुमारे 750 हून अधिक एसटी बसेसची चाके गेली 62 दिवस विविध आगारात थांबली होती. मात्र, काही परराज्यात जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना एसटी बसच्या माध्यमातून त्यांच्या राज्याच्या सिमेवर सोडण्यात आले.
जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. त्यानुसार 50 टक्के बससेवा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून 50 टक्के प्रवासी घेवून एसटी बस विविध मार्गावर धावल्या. सुमारे 62 दिवसाच्या कालावधीनंतर एसटी त्या त्या आगारातून मार्गस्थ झाल्या. मात्र, प्रवाशांनी कोरोनाचा धसका घेतला असल्याने एसटीकडे पाठ फिरवली.त्यामुळे काही मार्गावर धावलेल्या एसटी बसमध्ये चालक व वाहक यांच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हते तर काही ठिकाणच्या बसमध्ये तुरळक प्रवासी दिसत होते.
महामंडळाच्या सातारा विभागातून सातारा आगारातून सातारा-पुसेसावळी चार फेऱ्या, कराड आगारातून कराड-शिरवळ दोन फेऱ्या, पारगाव-खंडाळा आगाराच्या शिरवळ-कराड दोन तर, लोणंद-सातारा अशा चार फेऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोरेगाव आगारातून कोरेगाव-कराड सहा फेऱ्या, फलटण आगारातून फलटण- सातारा सात फेऱ्या, फलटण-लोणंद सहा फेऱ्या, वाई आगारातून वाई-सातारा सहा, पाटण आगारातून पाटण-सातारा आठ तर, पाटण-कराड सहा फेऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दहिवडी आगारातून दहिवडी-सातारा चार, दहिवडी-कराड तीन, दहिवडी-म्हसवड सहा, महाबळेश्वर आगारातून महाबळेश्वर-सातारा आठ, महाबळेश्वर-वाई 12, मेढा आगारातून मेढा-सातारा सात, वडूज आगारातून वडूज-सातारा चार, वडूज-कराड चार, औंध-सातारा दोन फेऱ्याच असे मिळून तालुक्यांच्या ठिकाणावरुन 31 एसटी बसच्या माध्यमातून 101 फेऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र पाटण -सातारा, वाई – सातारा, महाबळेश्वर- वाई, कराड – शिरवळ, शिरवळ – कराड, दहिवडी – सातारा, वडूज – सातारा, सातारा – पुसेसावळी अशी प्रत्येकी एक फेरी तर मेढा – सातारा बसच्या दोन अशा 10 फेर्या झाल्या त्यातून फक्त 30 प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती विभाग नियंत्रक सागर पळसले यांनी दिली.
शासनाने दिलेल्या आदेशानुसार एसटी बसचे सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. एसटीत चढणाऱ्या प्रवाशांचे हातही सॅनिटायझर केले जात आहेत. शारीरिक अंतर राखण्यासाठी एका एसटीतून केवळ 20 प्रवाशांनाच घेतले जाणार आहे. तसेच तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. विविध आगारातून सोडण्यात आलेल्या एसटी बसेसच्या फेऱ्याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन विभागीय वाहतूक अधिकारी विजय मोरे यांनी केले आहे.
दररोज होणार 216 फेऱ्या
सातारा पुसेसावळी 6 फेऱ्या, पुसेसावळी सातारा 6 फेऱ्या,कराड शिरवळ 4 फेऱ्या, शिरवळ कराड 4 फेऱ्या, खंडाळा शिरवळ 2 फेऱ्या, शिरवळ खंडाळा 2 फेऱ्या, कराड पाटण 9 फेऱ्या, पाटण कराड 9 फेऱ्या,पाटण सातारा 5 फेऱ्या, सातारा पाटण 5 फेऱ्या, मेढा सातारा 8 फेऱ्या, सातारा मेढा 8 फेऱ्या, महाबळेश्वर सातारा 14 फेऱ्या,महाबळेश्वर वाई 10 फेऱ्या,वाई महाबळेश्वर 10 फेऱ्या, कोरेगाव आगाराच्या कोरेगाव कराड 6 फेऱ्या, कराड कोरेगाव 6 फेऱ्या, वडूज आगाराच्या वडूज सातारा 7 फेऱ्या सातारा वडूज 7 फेऱ्या, वडूज औंध सातारा 2 फेऱ्या, सातारा औंध वडूज 2 फेऱ्या, वाई आगाराच्या वाई सातारा 10 फेऱ्या, सातारा वाई 10 फेऱ्या, पारगाव खंडाळा आगाराच्या शिरवळ कराड 2 फेऱ्या, कराड शिरवळ 2 फेऱ्या, सातारा लोणंद 6 फेऱ्या, लोणंद सातारा 6 फेऱ्या, फलटण आगाराच्या फलटण सातारा 6 फेऱ्या, सातारा फलटण 6 फेऱ्या, फलटण लोणंद 6 फेऱ्या, लोणंद फलटण 6 फेऱ्या, दहिवडी आगाराच्या दहिवडी सातारा 7 फेऱ्या, सातारा दहिवडी 7 फेऱ्या, दहिवडी कराड 6 फेऱ्या, कराड दहिवडी 6 फेऱ्या होणार असल्याची माहिती विभागीय वाहतून अधिकारी विजय मोरे यांनी दिली.