लाल परी च्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लाल बावटा प्रयत्न करणार – आमदार कॉ. विनोद निकोले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० नोव्हेंबर २०२१ | मुंबई | लाल परी च्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लाल बावटा प्रयत्न करणार असल्याचे  सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) महाराष्ट्र राज्य सचिव तथा माकपचे डहाणू विधानसभा आमदार कॉ. विनोद निकोले यांनी सांगितले असून याबाबत मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना निवेदन दिले आहे.

यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस चा रंग लाल आहे. आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) या कामगार संघटनेच्या झेंड्याचा रंग देखील लालच आहे. तसेच वैज्ञानिकदृष्ट्या लाल रंग शरीराची ऊर्जा प्रभावित करतो. लाल रंग संघर्ष याचा प्रतीक मानला जातो. लाल रंगा मध्ये खूप ऊब असते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लाल रंग आत्मविश्वास वाढवतो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवून आतापर्यंत एकूण 35 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ही अतिशय खेदजनक बाब आहे. मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळात सार्वजनिक प्रवासी बस वाहतूकीच्या खाजगीकरणाच्या राजकीय व शासकीय धोरणातून खाजगी वाहतूकदारांना मुक्तद्वार देण्यात आले आहे. त्यांचे कार्य केवळ नफा कमविण्याचे असल्याने केवळ नफा निर्माण होणाऱ्या मार्गांवर प्रवासी वाहतूक देण्यात येऊन, खेड्यापाड्यात गोरगरिबांच्या दाराशी सेवा देणारी जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला आर्थिक विपन्नावस्थेत ढकलण्यात आले आहे, तसेच वाढते इंधन दर, सर्व प्रकारच्या करांचा बोजा, सामाजिक बांधिलकी मानून सवलतीच्या दरात विविध घटकांना दिलेली प्रवासाची रास्त सुविधा, मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वगैरे बाबी एस. टी. महामंडळाच्या विपन्नावस्थेला कारणीभूत आहेत. एस. टी. महामंडळ आर्थिक डबघाईला आल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर वेतन वेळेवर न मिळण्याची आणि भविष्य अंध:कारमय होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी व मालमत्ता महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेऊन, एस. टी. कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी घोषित करून महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या वेतनादि सर्व सेवाशर्ती लागू कराव्यात. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरण व्हावे म्हणून कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मी पाठिंबा देत असून त्यांच्या मागण्यांचे मी समर्थन करीत आहे, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांची सांगितले असून त्यांनी दिलेले निवेदन मुख्यमंत्री सचिवालयाने अप्पर मुख्य सचिव परिवहन विभागाला पाठविले आहे असे कळविण्यात आले आहे, असे आ. निकोले म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!