दैनिक स्थैर्य । दि.०२ एप्रिल २०२२ । सातारा । “आपण ज्या मातीतून आलो त्या मातीसाठी नेहमी काहीतरी करण्याची भावना असावी. महात्मा फुलेंना सावित्रीबाई फुलेंनी जी साथ दिली. त्याच तोलामोलाची साथ कर्मवीर भाऊराव पाटील यांना लक्ष्मी वहिनींनी दिली. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष अजूनही उत्तम प्रकारे बहरत आहे. गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत आहे.”असे उद्गार रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या डॉ. पल्लवी पाटील-वर्धमान यांनी केले. महात्मा फुले अध्यापक विद्यालयांमध्ये रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य उदयकुमार सांगळे होते ते आपल्या मनोगतामध्ये म्हणाले, “जैन समाजाच्या कठोर कर्मठ असणार्या संस्कारामध्ये वाढलेल्या लक्ष्मी वहिनींनी वसतिगृहातील मुलांना आपली ओढ कधी लावली, हेदेखील समजले नाही. महार, मांग जातीतल्या सर्व वसतिगृहातील मुलांवर त्यांनी प्रचंड माया केली. वसतिगृहातील सर्व मुले ती आपलीच मुले अशा भावनेने त्या मुलांवर अपरंपार प्रेम केले. प्रसंगी आपल्या अंगावरचे सर्व सोने- नाणे अगदी सौभाग्यलंकार सुद्धा त्यांनी वसतिगृहातील मुलांसाठी खर्च केले. वसतिगृहाचा सेक्रेटरी आप्पालाल शेख हे सौभाग्यलंकार गहाण ठेवायला नकार दिल्याने त्या म्हणाल्या माझा पती एवढा कर्तबगार असताना मला या सोन्याची काय गरज यावरून त्याग, समर्पण काय असते याची कल्पना येते. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी त्यांना देवाज्ञा झाली. परंतु गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी मुलांना गोडधोड खायला द्या. बोर्डिंगचे हे रोपटे मरु देऊ नका, हे त्यांनी शेवटचा काढलेले अखेरचे शब्द होते. भाऊरावांनी देखील मी सर्वांचे ऋण फेडीत आलो,परंतु माझ्या पत्नीचे ऋण मला आजतागायत फेडता आले नाही .असे उद्गार काढले. खरोखरच लक्ष्मीबाईंनी जो त्याग केला,जे समर्पण केले त्यांचे ऋण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्याप्रमाणेच कोणत्याही भारतीय व्यक्तीला फेडता येणार नाही.”
कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षारोपण, भित्तिपत्र उद्घाटन,रयत माऊली पुष्पांजली’विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्रे वितरण प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीस रयत माऊली गीतानंतर प्राध्यापक प्रदीप हिवरकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात लक्ष्मीबाईंच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. प्रमुख अतिथींचा परिचय व स्वागत निवेदन प्रीती माने तर प्रमाणपत्र वितरण निवेदन सुनीता साबळे यांनी केले. याप्रसंगी प्राध्यापक रवींद्र घाटगे, प्रा. सोमनाथ शिंगाडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या वतीने हृषिकेश साळुंखे,श्रावणी राजमाने यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार रितेश बल्लाळ तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश घाडगे व ऋतुजा दरेकर यांनी केले.