स्थैर्य, वाई (जि. सातारा), दि.४: जललक्ष्मी प्रवाही सिंचन योजनेची पाईपलाइन फुटल्याने व शेतात मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने बोरगाव (खुर्द) येथील स्ट्रॉबेरी पिकाचे व भाताच्या गंजीचे सुमारे तीन ते चार लाखांचे नुकसान झाले आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्यापासून वंचित शेतीला बलकवडी धरणातून प्रवाही सिंचन पद्धतीने पाईपलाइन टाकून पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. वयगाव पासून सिद्धनाथवाडी (वाई) पर्यंत ह्या योजनेची पाईपलाइन आहे. या पाईपलाइनमधून गेल्या चार वर्षांपासून पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी किरकोळ पाणी गळती झाल्यास ओढ्यातून नदीला सोडण्यात येते. या योजनेतून मागील चार दिवसांपूर्वी शेतीला पाणी उपलब्ध करण्यात आले आहे.
आज बोरगाव (खुर्द) येथे अचानक पाईपलाइन फुटून मोठ्या प्रमाणात लगतच्या शिव नावाच्या शिवारात पाणी घुसल्याने स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान झाले. या शिवारात शिवाजी तुकाराम वाडकर यांनी स्ट्रॉबेरीची दहा हजार रोपे तयार केली होती. मात्र, पाणी घुसल्याने त्याचे सुमारे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती शिवाजी वाडकर यांनी दिली. याशिवाय लगतच्या शिवारातील भात गंजी भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाईपलाइन फुटल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने योजनेचे पाणी बंद करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.