दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे ऐतिहासिक फलटण नगरीमध्ये आज, शुक्रवार, दि.२० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता येत असून त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेला शहर व ग्रामीण भागातील मराठा समाज लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा फलटण समन्वयकांनी दिली आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांची सासुरवाडी व छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ असलेल्या व प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच महानुभव पंथीयांची दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या फलटण या ऐतिहासिक नगरीत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे प्रथमच येत असून त्यांनी मराठा समाजाला ५० टक्केच्या आतील आरक्षण मिळण्यासाठी ‘विना अन्न पाणी’ अशा पध्दतीने उपोषण केले व कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा माझी अंत्ययात्रा निघेल, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून २४ ऑक्टोबर ही ‘डेडलाईन’ दिली असून त्या पार्श्वभूमीवर अगोदर दोन दिवस मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यातील फलटण येथे येत असल्याने ते केंद्र व राज्य सरकारला कोणता इशारा देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.
सातारा जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रासह देशात मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखला जात असून छत्रपती शिवाजी महाराज यांची सासुरवाडी व धर्मवीर संभाजीराजे यांचे आजोळ असून या फलटण तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी आत्तापर्यंत तब्बल २८ गावात मराठा क्रांती मोर्चा फलटण या शाखा उघडल्या आहेत. यानिमित्ताने हजारो मराठा बांधवावर कोणताही अन्याय झाला की त्या अन्यायाच्या विरोधात पेटून उभे राहतात व समाजबांधवांना न्याय देतात. यामुळे फलटण तालुक्यातील मराठा समाज बांधव आता ५० टक्केच्या आतून आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी एकमुखाने मागणी करीत आहे.
जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सासुरवाडीत फलटण नगरीत सायंकाळी ५ वाजता पोहोचत असून त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ९ वाजता मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. या बाईक रॅलीने फलटण शहरात मराठा समाजात जनजागृती करण्यात येणार आहे. दरम्यान, सायंकाळी ५ वाजता बारामती मार्गावरून मनोज जरांगे पाटील हे येणार असून त्यांचे स्वागत जेसीबीतून पुष्पवृष्टी करून करण्यात येणार आहे. त्यानंतर हलगी व तुतारीच्या निनादात भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यांची सायंकाळी भव्य दिव्य अशी विराट सभा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे. त्यानिमित्ताने वनवास यात्रेचे जनक योगेश केदार व ५० टक्केच्या आतील आरक्षण मिळवून देण्यासाठी श्री क्षेत्र तुळजाभवानी माता मंदिर, तुळजापूर ते आझाद मैदान मुंबई येथे पायी चालत वनवास यात्रा काढली व तब्बल तीन महिने आरक्षणाचा लढा उभारला व सरकारचे लक्ष वेधले गेले होते.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला कोल्हापूरचे मराठा मार्गदर्शक व कायदेशीर अभ्यासक बाबा इंदलकर हेही मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या समन्वयकांनी दिली आहे. ‘ना भूतो ना भविष्यती’ असा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाने पूर्ण पाठिंबा दिला आहे. यामुळे लाखो मराठा समाज आजच्या सभेला फलटणमध्ये येणार आहे.
पार्किंग व्यवस्था
विमानतळ, श्रीराम सहकारी साखर कारखाना, अनंत मंगल कार्यालय, शिवाजीनगर येथील नगरपालिका शाळा मैदान, नगरपालिका कार्यालय जवळील पार्किंग व डेक्कन चौक या ठिकाणी पार्किंग व्यवस्था केली आहे. कोणत्याही मराठा बांधवाने वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशी वाहने उभी करू नयेत, असे मराठा क्रांती मोर्चा फलटण यांनी सर्व समाजबांधवांना सूचना केल्या आहेत.