कामगार नेते उद्धव भवलकर यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, औरंगाबाद, दि.७: कामगार नेते कॉम्रेड उद्धव भवलकर यांचे निधन झाले आहे. ते ६८ वर्षांचे होते. भवलकर यांच्या अचानक जाण्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आणि सीटूचे अर्थात कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारा नेता आणि चांगला वक्ता गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. उद्धव भवलकर यांना काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आतड्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

२ मार्च १९५२ रोजी भवलकर यांचा उस्मानाबाद जिल्ह्यात जन्म झाला. भवलकर यांनी कळंबला १९७५ला एसएफआयचे पहिले राज्य अधिवेशन भरवले. पहिल्या अखिल भारतीय अधिवेशनात त्यांनी डॉ. विठ्ठल मोरे, कॉ. अरूण शेळके यांच्यासह राज्याचे प्रतिनिधित्व केले. या कामगिरीमुळे त्यांना एसएफआयचे संस्थापन सदस्य म्हणून ओळखले जाऊ लागले. १९७५ ते १९८१ च्या संगमनेर राज्य अधिवेशनापर्यंत ते सक्रिय नेते म्हणून कार्यरत होते. संगमनेर अधिवेशनात विद्यार्थी नेते म्हणून त्यांनी निवृत्ती घेतली. आज औरंगाबादमध्ये असलेले सीटू भवन हे संघटना व पक्षाचे कार्यालय त्यांनी उभे केले. संघटनात्मक आणि संस्थात्मक चळवळ उभी राहिली पाहिजे, हा त्यांचा अट्टाहास होता. शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी औद्योगिक वसाहतीत कामगारांच्या मुलांमुलींसाठी शाळा सुरू केली. या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढयातील ‘नामांतर योद्धा’ म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच मराठवाडा विकास आंदोलनातही ते सक्रिय होते. त्यांच्या जाण्यामुळे मराठवाड्यातील डावी व कामगार चळवळ पोरकी झाल्याची भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!