
स्थैर्य, 11 फेब्रुवारी, सातारा : ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी महाराष्ट्राला व्यापक इतिहास दृष्टी दिली आहे. तरुण पिढीला त्यांच्या विचारांचे प्रचंड आकर्षण आहे,असे मत मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष,इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक, भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजा दीक्षित, पुणे यांनी व्यक्त केले.
नरहर कुरुंदकर यांच्या स्मरणार्थ श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह (थोरले )महाराज, नगरवाचनालयाच्या पाठक हॉल मध्ये आयोजित केलेल्या ’नरहर कुरुंदकर यांची इतिहास दृष्टी ’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. विचारमंचावर ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ व दिनकर झिंब्रे उपस्थित होते.
डॉ. राजा दीक्षित म्हणाले, नरहर कुरुंदकर महाराष्ट्रातील मोजक्या, दुर्मिळ थोर विचारवंत, लेखक,भाष्यकारा पैकी एक होते. त्यांच्या लेखन व भाषणात प्रकट झालेली जीवनदृष्टी आणि इतिहास दृष्टी एकच आहे. ती विवेकवादी व बुद्धिवादी आहे.
नरहर कुरुंदकर पुरोगामी तत्त्वज्ञ व जात विरोधी होते. विषमतेचा पुरस्कार करणारी मनुस्मृति त्याज्य असल्याचे त्यांनी मानलेय. सेक्युल्यारिझम बाबतची त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट व परखड भारतीय संविधान मूल्याशी सुसंगत अशी आहे. भारतीय संविधानाला छेद देणार्या हिंदू राष्ट्राच्या कल्पनेस त्यांनी रोखठोक सवाल केले आहेत.
इतिहासकारांनी वर्तमानाची गरज आणि भूतकाळाचा अचूक अन्वयार्थ लावण्याची गरज आहे समाज परिवर्तन व सुधारण्यासाठी ते आवश्यक आहे. इतिहासकाराची भूमिका भाऊकपणा ऐवजी वस्तुनिष्ठ असली पाहिजे. ऐतिहास कादंबरीचा गाभा केवळ घटना नाही तर इतिहास पुरुषाचे सार्वकालिक व्यक्तिमत्त्वाचे व अंत:प्रवाहाचे आकलन असले पाहिजे. रोमांचकारक घटनांचा मोह टाळला पाहिजे. वस्तुनिष्ठता जोपासली पाहिजे.
आजचे औपचारिक इतिहास वर्तुळातील इतिहासकार यांचे लेखन अतिशय तोकडे व असमाधानकारक आहे. मराठी लेखन परंपरेतील छुपा जातीवाद हे मोठे वैगुण्य आहे. लेखकाला सामाजिक उत्तरदायित्व असले पाहिजे.
नरहर कुरुंदकर इतिहास अभ्यास निर्मिती मंडळावर असते तर फार बरे झाले असते. ते मूर्ती पूजक तसेच मूर्तीभंजकही होते. मूर्तीभंजन करताना त्यांनी कमालीची वस्तुनिष्ठता व तटस्थता बाळगली होती. छत्रपती शिवाजी महाराज ईश्वर नव्हते तर श्रेष्ठ राजे होते जनतेच्या स्वातंत्र्याचे प्रतिनिधी होते त्यांनी मराठी भाषा,मराठी राज्य तसेच आरमार व भक्कम किल्ले बांधायचे मौलिक काम केले आहे. कुरुंदकरांच्या शिवचरित्रात महाराजांचा एकेरी उल्लेख असला तरी तो त्यांनी आदरपूर्वक केलेला आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर हे श्रेष्ठ ज्ञानर्षी होते. त्यांची संविधान निर्मितीची कामगिरी मोलाचीच आहे. पण भारतीय संविधान स्वातंत्र्य चळवळीच्या उत्क्रांतीतून आकाराला आले आहे. हे डोळसपणे समजून घेतले पाहिजे. असे कुरुंदकर म्हणतात.
किशोर बेडकिहाळ यांनी प्रास्ताविक केले व दिनकर झिंब्रे यांनी आभार मानले. कार्यक्रमास मान्यवर लेखक,संशोधक, अभ्यासक, विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

