
स्थैर्य, पांचगणी, दि. 06 : वाई येथील रामडोह आळीतील कृष्णाबाई संस्थानच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी करोना विषाणू निवारण दिवसांमध्ये तब्बल 66 दिवस अथक परिश्रमांतून वाई पोलिसांना दुपारचे जेवण मोफत पुरविले. गेले 75 दिवसांहून अधिक काळ आपल्याकडे लॉकडाऊन परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे शासनाने संचारबंदी जाहीर केल्याने पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आलेला होता.
पोलिसांना रात्रंदिवस रस्त्यारस्त्यांवर उभे राहून स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेवर नियंत्रण ठेवावे लागत होते. दिवसाचे वेळी तळपत्या उन्हामध्ये अनेक पोलीस आपल्याला रस्त्यावर उभे राहिलेले दिसून आले. पोलिसांना 12 तासांहून अधिक काळ सेवा बजवावी लागत असल्याने त्यांच्या जेवणाची हेळसांड होताना दिसत होती. पोलिसांची भोजनाची नेमकी गरज ओळखून रामडोह आळीतील कृष्णाबाई संस्थानचे प्रमुख कार्यकर्ते अनिल शेंडे, माधव तावरे, मिलिंद पुरोहित, रोहित चंद्रस, योगेश देशपांडे, घनश्याम शेंडे, जितेंद्र पाठक व अन्य प्रमुख कार्यकर्त्यांनी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी उशिरापर्यंत शहर व परिसरांतील 38 ते 40 पोलिसांना दुपारच्या जेवणाची मोफत सुविधा पुरविली. हे कार्यकर्ते सकाळी एकत्र जमून रामडोह आळी व गंगापुरीतून सौ. पटवर्धन यांच्याकडून पोळ्या गोळा करीत असत. त्यानंतर महिला कार्यकर्त्या सौ. नीला शेंडे, सौ. मधुवंती पुरोहित, सौ. विशाखा तावरे, सौ. रश्मी शेवडे, श्रीमती ज्योती कानडे, यांनी अनिल शेंडे यांचे घरी भाजी, चटणी- कोशिंबीर तयार करीत असत. पोळ्या व भाजी, चटणी कोशिंबीर पॅक करून जेवणाच्या पिशव्यांचे बॉक्स पोलीस कर्मचा-यांकडे देत असत. नंतर ते पोलीस कर्मचारी डय़ूटीवर असणा-या त्यांच्या सहका-यांपर्यंत हे जेवण दुपारच्या वेळी जेवण पोहचवित असत.
रामडोह आळीतील कार्यकर्त्यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे पोलीसांच्या कुटुंबियांना स्वयंपाक करण्याची व डबा पोहचविण्याची काळजी नव्हती. विशेषतः महिला पोलिसांची चांगली सोय झाली. त्यातच पोलिसांच्या जिह्यामध्ये कोठेही डय़ूटी लावण्यात आल्याने घरांपासून दूर असलेल्या पोलिसांची जेवणाची उत्तम सोय झाली. या उपक्रमासाठी कार्यकर्त्यांनी पदरमोड करून तसेच वाईतील दानशूर व्यक्ती दि वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे, संचालक प्रा. विष्णू खरे, गिरिश देशपांडे, सीईओ श्रीपाद कुलकर्णी, निवृत्त अधिकारी विजयकुमार मुळीक, अधिकारी सुहास पानसे, रिझर्व्ह बँकेतील निवृत्त अधिकारी अविनाश जोशी, मामा वनारसे, हर्षद पटवर्धन, तानाजी काळे, तानाजी गाढवे, अशोक लोखंडे, माधव चौंडे, योगेश चंद्रस, चंद्रकांत कुलकर्णी, अच्योतानी बंधू, विजय लुकतुके, डॉ. विजय तावरे, श्री. दारूवाले, आदींनी याकामी आपल्या परिने या उपक्रमास वस्तुरूपाने व आर्थिक मदत केली. 66 दिवसांपैकी एक दिवस भाजी व एक दिवस पुलाव आळीतील सौ. महाडिक व सौ. भारती निकम यांनी स्वखर्चाने करून दिला. दि. 22 मार्चचा जनता संचारबंदी व त्या दरम्यान झालेले पोलिसांचे हाल पाहून रामडोह आळीतील कार्यकर्त्यांना पोलिसांची सेवा करण्याची इच्छा झाली. या उपक्रमाची व्याप्ती पाहून पोलीस अधीक्षक सौ. तेजस्विनी सातपुते यांनीही मान्यता दिली. या कार्यकर्त्यांनी अक्षय्य तृतियेला पोलिसांना आम्रखंडाचे मिष्टांन्न व 50 दिवस पूर्ण झाल्यानंतर गोड शिऱ्याचे जेवण व दररोज पाण्याच्या बाटल्या असे साहित्य मोफत पुरविले.
पोलिसांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. या 66 दिवस चाललेल्या कार्यक्रमाच्या समारोपासाठी वाईचे पोलीस निरिक्षक आनंदराव खोबरे, उपनिरिक्षक कांबळे, पोलीस कर्मचारी भोसले, पीएसआय कदम व प्रमुख अधिकारी रामडोह आळीत उपस्थित राहिले. कार्यकर्त्यांनी पोलिसांना लॉकडाऊनच्या काळातही सकस आहार पुरविल्याबद्दल या कार्यकर्त्यांचे विशेषतः महिला कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.