दैनिक स्थैर्य | दि. १७ नोव्हेंबर २०२४ | फलटण | ‘‘ आपल्या घराण्याची सेवा करण्याची परंपरा जपण्यासाठी ते रामराजे राजकारणात आले. पहिल्या निवडणूकीत स्वत:च्या हिंमतीवर ते आमदार झाले. आपल्या भागाला पाणी कसे देता येईल या प्रश्नावरचे एक अभ्यासू म्हणून त्यांचा लौकीक होता. कृष्णा खोरे प्रकल्पाच्या कामाची जबाबदारी रामराजेंनी आपल्या खांद्यावर घेतली आणि त्यांच्या कालखंडात त्या कामाला गती मिळाली’’, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी काढले.
फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ शहरातील गजानन चौक येथे पार पडलेल्या जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. व्यासपीठावर आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, सह्याद्री कदम, महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांच्यासह महाविकास आघाडीतील सहयोगी पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘‘साखरवाडीच्या सभेत राज्य सरकारमधल्या एका नेत्याने रामराजेंना आमदार त्यांनी केलं असं सांगितलं. ही गंमतीची गोष्ट आहे. खरं तर पक्षाचा अध्यक्ष मी होतो. कुणाला तिकीट द्यायचं तो अधिकार माझ्याकडं. ज्यांनी हे सांगितलं त्यांनाही मीच आमदार केलं होतं. माझं नशिब चांगलय नाहीतर त्यांनी असं सांगितलं असतं शरद पवारांना मीच आमदार केलं होतं.’’, अशी खोचक टिका खा.शरद पवार यांनी ना.अजित पवार यांचे नाव न घेता करत, ‘‘राजकीय मतभेद असला तरी एकमेकांचा सन्मान ठेवायचा असतो. पदाची, व्यक्तीची प्रतिष्ठा आपण ठेवली तर लोक आपल्याकडे त्याच भावनेतून बघत असतात. चुकीची टिका केली तर लोकांना ते आवडत नाही’’, असेही खा.शरद पवार यांनी यावेळी सुनावले.
‘‘लाडक्या बहिणींना अर्थसहाय्याची नाही तर संरक्षणाची आवश्यकता आहे. दर तासाला पाच महिलांच्या अत्याचाराच्या घटना आज पोलीस स्टेशनमध्ये येत आहेत. या सरकारच्या कालखंडामध्ये 20 हजारांपेक्षा अधिक शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. महिला, शेतकरी आणि तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. विद्यार्थ्यांनी शिकल्यानंतर नोकरीसारखा प्रश्न आज गंभीर झालेला आहे. चित्र असं दिसतंय की मुलांना नोकरी मिळत नाही, त्यांच्यामध्ये निराशा होत आहे’’, असेही खा.शरद पवार यांनी यावेळी अधोरेखित केले.
‘‘फलटण आणि बारामतीचं वेगळं नातं आहे. महाराष्ट्रात 1845 साली दुष्काळाची स्थिती होती. त्यावेळेला निरा डावा – निरा उजवा कालव्याचा निर्णय झाला. तिथून पाणी येऊ लागलं पण कारखानदारी नव्हती. या सगळ्यात स्वातंत्र्यानंतर बदल झाला. हे चित्र बदलल्याचं श्रेय श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांना द्यावं लागेल. या प्रदेशातल्या शेतकर्याच्या जीवनात बदल कसा करता येईल एवढा एकच विचार त्यांनी केला. फलटण, बारामती इथं जी काही सुबत्ता आली त्याचे श्रेय श्रीमंत मालोजीराजे यांना द्यावं लागेल’’, असेही खा.शरद पवार यांनी सुरुवातीला सांगितले.
‘‘ मध्यंतरी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली, आता विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा? याचा निकाल आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. ज्यांच्या हातामध्ये आपण महाराष्ट्राची सत्ता दिली त्यांचा पाच वर्षांचा अनुभव बघितला तर आज इथे सत्तेमध्ये बदल केल्याशिवाय पर्याय आपल्या सगळ्यांसमोर नाही. त्यासाठी दीपक चव्हाण यांना विजयी करा’’, असे आवाहनही खा.शरद पवार यांनी शेवटी केले.