स्थैर्य, सांगली, दि. २०: जत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची रूग्णसंख्या वाढत आहे. कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी जतपासून सांगलीचे अंतरही जास्त आहे. अशा संकटाच्या काळात जत येथे ७० ऑक्सिजनयुक्त बेड्सचे समर्पित कोविड हेल्थ सेंटर सुरू केले आहे. जत तालुक्यासाठी ही अत्यंत चांगली व्यवस्था उपलब्ध केली आहे याचे समाधान आहे. यामुळे जत तालुक्यातील रूग्णांना फार मोठे सहाय्य मिळणार असून रूग्णांचे प्राणही वाचणार आहेत, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह जत येथील 70 ऑक्सिजनयुक्त बेड्सच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनिता पवार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, येणाऱ्या काळात कोरो बाधित रूग्णांची संख्या कमी करण्यासाठी सर्वांनी घरात थांबणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या कडक निर्बंधांचे तंतोतंत पालन करावे. कोरोना काळात प्राथमिक आरोग्य केंद्रानींही फार मोठी मदत केली आहे. त्यांचे महत्त्व कोरोना काळात समजले आहे. आरोग्य सेवेवर भर देणे, जिल्ह्यात आरोग्य सेवा वाढविणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सद्यस्थितीत ऑक्सिजन जेमतेम उपलब्ध होत असतानाही सर्वांच्या पुढाकाराने जत येथे 70 ऑक्सिजनयुक्त बेड्सचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पहाणी करून समाधान व्यक्त केले.
मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह जत येथील 70 ऑक्सिजनयुक्त बेड्सच्या उद्घाटनंतर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जत येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींची शासकीय निवासी शाळा येथे सुरू असलेल्या समर्पित कोविड हॉस्पीटलला भेट देवून तेथील डॉक्टरांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.