स्थैर्य, रोहा, दि २२: कोकणात सध्या मोठे औद्योगिक परिवर्तन होत असून कोकण भविष्यात राज्याची आर्थिक ताकद बनेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. रविवारी रोहा (जि. रायगड) येथील कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, कोकणात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण होत असून मच्छीमारी आणि पर्यटन क्षेत्रांत कोकण गतीने पुढे येत आहे. न्हावाशेवा प्रमाणे दिघी आणि वाढवण ही दोन बंदरे देशाच्या आयात- निर्यात व्यापारात मोठा वाटा उचलतील. परिणामी आर्थिक बदलाचे केंद्र बनत असलेले कोकण भविष्यात राज्याची ताकद बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नद्या इतिहास घडवतात, नद्या संस्कृती घडवतात, नद्या मानवी जीवनातील परिवर्तनाचे केंद्र असतात. मात्र त्याच नद्या आपण प्रदूषित करत आहोत, याविषयी पवार यांनी खंत व्यक्त केली. कुंडलिका संवर्धन प्रकल्प पाहून आपल्याला काश्मीरमध्ये आल्याप्रमाणे वाटत असल्याचे नमूद करत तटकरे कुटुंबीयांचे कुंडलिका नदीच्या संवर्धनाबद्दल अभिनंदन केले. कोरोनाचा नवा विषाणू अधिक घातक आहे. त्यामुळे पुढचे दोन महिने आपण सर्वांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.