कोळकी ग्रामपंचायतीत ‘पतिराज’? सत्ताधाऱ्यांच्या मनमानी आणि भ्रष्टाचाराविरोधात सदस्यांचा एल्गार; गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार


कोळकी ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधाऱ्यांचा मनमानी कारभार आणि ‘पतिराज’ सुरू असल्याचा आरोप करत सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. विकासकामे अडवणे आणि बोगस बिले काढल्याचाही आरोप. वाचा सविस्तर.

स्थैर्य, फलटण, दि. 03 डिसेंबर : फलटण तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कोळकी ग्रामपंचायतीचा कारभार सध्या चव्हाट्यावर आला आहे. ग्रामपंचायतीचे सत्ताधारी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक हे मनमानी कारभार करत असून ग्रामपंचायतीमध्ये ‘पतिराज’ सुरू असल्याचा गंभीर आरोप विरोधी गटातील सदस्यांनी केला आहे. यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

नेमके आरोप काय?

कोळकी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी दिलेल्या निवेदनात सत्ताधाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत:

  • मनमानी कारभार: मासिक मिटिंगमध्ये विरोधी गटातील सदस्यांनी सुचवलेली कामे घेतली जात नाहीत आणि घेतली तरी मंजूर केली जात नाहीत. मंजूर कामांचे टेंडर काढले जात नाही.

  • ‘पतिराज’चा आरोप: सरपंच या महिनयातून केवळ एकदाच मासिक मिटिंगसाठी उपस्थित राहतात. मात्र, त्यांचे पती वारंवार दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप करतात. त्यामुळे ग्रामपंचायतीत ‘पतिराज’ चालू आहे की काय, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला आहे.

  • बोगस बिले आणि भ्रष्टाचार: जी कामे झाली आहेत, त्यांची बिले न काढता कंत्राटदारांना त्रास दिला जातो. दुसरीकडे, स्वतःच्या वॉर्डात बोगस कामे करणे, मंजुरी न घेता कामे करणे आणि खोटी बिले काढणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत.

  • जनतेची कामे रखडली: लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून, सरपंच व ग्रामसेवक गाऱ्हाणी ऐकून घेत नाहीत.

मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा

या भ्रष्ट कारभाराची चौकशी करून सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांना नोटीस काढावी, अन्यथा ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याकडे तक्रार करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदन देताना यांची उपस्थिती

हे निवेदन फलटण पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी एस.व्ही. जाधव यांनी स्वीकारले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच रेश्मा संजय देशमुख, प्राजक्ता सागर काकडे, लक्ष्मी रणजीतसिंह निंबाळकर, रुपाली सागर चव्हाण, वर्षा ज्ञानदेव शिंदे, निर्मला यशवंत जाधव आणि सदस्य तथा माजी उपसरपंच विकास अशोक नाळे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!