फलटण तालुक्यात खरीप पेरण्या ९० % पूर्ण : पाऊस नसल्याने चिंतेची स्थिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : फलटण हा प्रामुख्याने रब्बीचा तालुका परंतू बदलत्या निसर्गामुळे गेल्या काही वर्षात येथे खरिपाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. यावर्षीही खरीप पेरण्या ९० % पर्यंत पूर्ण झाल्या आहेत, पिके जोमदार आहेत पण पाऊस नसल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे.

आडसाली ऊस लागणी खोळंबल्या

दुसरीकडे गत महिन्यातील पावसाने आडसाली ऊसाच्या (१५/७ च्या) लागणी खोळंबल्या होत्या, आता पावसाने उघडीप दिली आहे, मात्र नीरा उजवा कालवा बंद झाल्याने आडसाली लागणी पुन्हा खोळंबल्या आहेत, कालव्याच्या किरकोळ दुरुस्तीचे काम सुरु असून जुलै अखेर कालवा पुन्हा सुरु होणार असल्याने आडसाली ऊस लागणी पुन्हा वेग घेतील अशी अपेक्षा आहे.

आता परतीच्या मान्सूनचीच प्रतीक्षा

दरम्यान ३५०/४०० मि. मी. इतकी अत्यल्प वार्षिक सरासरी असलेला पाऊस आतापर्यंत १८०.२ मि. मी. झाला असून ऑगस्ट सप्टेंबर मध्ये येणारा परतीच्या मान्सूनवर आता फलटण करांची मोठी भिस्त आहे, सध्या हवेत प्रचंड उष्णता असून हवामान पावसाळी असल्याने परतीच्या मान्सूनपूर्वी या वातावरणाचा काही फायदा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस नाही : धरणातील पाणी साठे कमी

धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस नसल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणातील पाणी साठे कमी असल्याने तेथेही पावसाची प्रतीक्षा आहे.  २३.५० TMC क्षमतेच्या भाटघर धरणात ८.८६ TMC म्हणजे ३७.६८ % (गतवर्षी ४९.०८%), ९.४५ TMC क्षमतेच्या वीर धरणात ३.६६ TMC म्हणजे ३८.८८ % (गतवर्षी ६५.२६ %), ११.७३TMC क्षमतेच्या नीरा-देवघर धरणात २.७५ TMC म्हणजे २३.६५ % (गतवर्षी ४९.५५ %), ३.६९ TMC क्षमतेच्या गुंजवणी धरणात १.८५ TMC म्हणजे ५०.०४ % (गतवर्षी ५६.६४ %) पाणी साठा आहे. नेहमी या कालावधीत सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस असतो, यावर्षी अद्याप समाधानकारक पाऊस सुरु नसल्याचे वरील तुलनात्मक आकडेवारीवरुन स्पष्ट होते.

खरीप पेरण्या अंतीम टप्प्यात, अंतर मशागतीची कामे सुरु

फलटण तालुक्यात खरीप बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र १४८४३ हेक्टर असून आतापर्यंत त्यापैकी १३१७८ हेक्टर म्हणजे ८८.७८ % बाजरीचा पेरा झाला असून खरीप पेरा अंतीम टप्प्यात आहे, पीक फुटवे व वाढीच्या अवस्थेत असून पिकाची वाढ समाधानकारक असल्याचे आणि शेतकरी अंतर मशागतीच्या कामात व्यग्र असल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

मकेच्या क्षेत्रात वाढ अपेक्षीत, अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव

तालुक्यात मका पिका खालील सर्वसाधारण क्षेत्र ४४९० हेक्टर असून आतापर्यंत ४००१ हेक्टर म्हणजे ८९.११ % क्षेत्रावर मका पेरा झाला आहे, तथापी यावर्षी सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर मका पेरा होण्याची शक्यता व्यक्त करतानाच मका पिकावर अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी दिसून आल्यावर नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना बाबत माहिती व मार्गदर्शनाद्वारे शेतकरी प्रबोधन सुरु आहे. पिकाची वाढ समाधानकारक असून अंतर मशागतीची कामे सुरु असल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी सांगितले.

गरवा कांदा दराअभावी पडून, हळव्याच्या लागणी पूर्ण

हळवा कांदा लागण सुमारे ३६५ हेक्टर क्षेत्रावर झाली असून अद्याप काही शेतकरी लागणीच्या विचारात आहेत, रोपे तयार आहेत मात्र कांद्याचे दर पडल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंताक्रांत झाला आहे. अनेकांनी दराच्या प्रतीक्षेत गरवा कांदा बाजारात न पाठविता दारात थप्प्या लावून ठेवला आहे, करोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा, हॉटेल्स बंद असल्याने कांद्याला मागणी नसल्याने कांद्याचे दर चांगलेच गडगडले आहेत, त्यामुळे गरवा कांदा साठवून ठेवता आला असला तरी दिवाळी सणाच्या दरम्यान तयार होणारा हळवा कांदा साठविता येणार नसल्याने मिळेल त्या दरात विकण्याशिवाय पर्याय नसल्याने शेतकरी हळवा कांदा लागण टप्प्या टप्प्याने करताना दिसून येतो. तालुक्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ३६८ हेक्टर असून संपूर्ण क्षेत्रावर सोयाबीन लागवड पूर्ण झाली असून पीक वाढीच्या अवस्थेत समाधानकारक असल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी सांगितले.

कपाशी पिकाला पुन्हा सुरुवात

एकेकाळी कापसाचे आगर आणि मोठ्या प्रमाणावर कापूस प्रक्रिया उद्योग उभ्या राहिलेल्या फलटण तालुक्यातील कापूस पीक बदलत्या हवामानानुसार गेली १०/१५ वर्षात अक्षरशः नामशेष झाले होते, आता पुन्हा कापूस लागणी सुरु झाल्या असून यावर्षी ३१ हेक्टरवर कपाशी लागण झाली असून पिके समाधानकारक स्थितीत वाढत असल्याचे दिसून आले आहे.

तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्याचा पेरा अपूर्ण

तालुक्यात ११२ हेक्टरवर तूर, उडीद, मूग वगैरे तृणधान्य, ५२ हेक्टरवर चवळी, पावटा, मटकी, हुलगा, वाटाणा वगैरे कडधान्यांचा पेरा झाला आहे तर ४१२ हेक्टरवर भुईमूग, सूर्यफूल, तीळ, सोयाबीन,   कारळे या गळीत धान्याचा पेरा पूर्ण झाला आहे. अद्याप या धान्यांचा पेरा सुरु आहे.

तालुक्यात १७ हजार हेक्टरवर ऊस : सर्वाधिक क्षेत्र ऊसाखाली

तालुक्यात ८५२९ हेक्टर आडसाली, ३९६१ हेक्टर पूर्वहंगामी, १८८४ हेक्टर सुरु, २३७२ हेक्टर खोडवा असे एकूण सुमारे १७ हजार हेक्टर ऊसा खालील क्षेत्र असून तालुक्यातील ४ साखर कारखान्यासह शेजारच्या माळेगाव, सोमेश्वर, भवानीनगर, जगदंबा वगैरे साखर कारखान्यांना  या तालुक्यातून ऊसाचा पुरवठा केला जातो, परंतू अलीकडे ऊसाचे पेमेंट वेळेवर मिळण्यात येत असलेल्या अडचणीमुळे ऊस उत्पादक शेतकरी हळू हळू फळबाग किंवा अन्य पिकांकडे वळू लागला आहे, या क्षेत्रात आलेली नवी पिढी अन्याय सहन करण्यास तयार नसल्याने आगामी काळात शेतमाल प्रक्रिया, निर्यात किंवा पिक बदलाची प्रक्रिया गतिमान होताना दिसली तर कोणी आश्चर्य वाटून घेऊ नये असे सद्यस्थिती आहे.

आडसाली ऊस लागणी खोळंबल्या

तालुक्यात सुमारे ८५२९ हेक्टरवर आडसाली ऊसाची लागण आतापर्यंत पूर्ण होते, यावर्षी मात्र केवळ २६५५ हेक्टरवर आडसाली ऊस लागणी झाल्या असून उर्वरित लागणी नीरा उजवा कालवा सुरु झाल्यावर गतिमान होतील अशी अपेक्षा आहे. दि. १५ जुलै व त्यापूर्वी तालुक्यात जोराचा नसला तरी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप पिके समाधानकारक आहेत, मात्र ऊसाच्या लागणी थांबल्या होत्या, आता पाऊस नाही, पण कालवा बंद झाला आहे. पाटबंधारे खात्याने ऊसाच्या लागणी खोळंबल्याने कालव्याच्या दुरुस्ती देखभालीचे काम हाती घेतल्याने कालवा बंद केला आहे, जुलै अखेर कालवा दुरुस्ती पूर्ण होऊन नीरा उजव्या कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडले जाईल अशी अपेक्षा आहे, त्यानंतर खोळंबलेल्या आडसाली ऊसाच्या लागणी गतिमान होतील.

स्ट्रॉबेरीच्या यशानंतर आता सफरचंदाचा प्रयोग

आदर्की येथे काही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी केला मात्र बाजार पेठ मिळविताना त्यांची दमछाक झाली, आता येथील नेहमीच्या ४०/४२ तापमानापेक्षा अधिक तापमानात चांगले येणाऱ्या सफरचंदाचा सुधारित वाण एका प्रयोगशील शेतकऱ्याने आणला असून त्याच्या यशस्वितेनंतर येथे सफरचंद बागा उभ्या राहतील का ? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सर्व आघाड्यावर सुरु असलेली परवड लक्षात घेऊन नव्या पिढीतील तरुण शेतकऱ्यांनी फळबागेला प्राधान्य दिल्याचे दिसून येते.

२५०० हेक्टरवर फळबागा उभ्या : भविष्यात वाढ अपेक्षीत

तालुक्यात सुमारे २५०० हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभ्या असून त्यामध्ये १४०० हेक्टरवर डाळिंब, २५४ हेक्टरवर आंबा, २२४ हेक्टरवर नारळ, ९१ हेक्टरवर सीताफळ, २८ हेक्टरवर पेरु, ४९ हेक्टरवर चिंच, ७६ हेक्टरवर द्राक्ष, १४९ हेक्टरवर चिक्कू, १४ हेक्टरवर लिंबू तसेच मोसंबी, अंजीर वगैरे फळबागा असल्याचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!