दैनिक स्थैर्य | दि. 30 नोव्हेंबर 2023 | कोळकी | फलटण शहराचे उपनगर समजले जाणाऱ्या कोळकी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये विविध ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये ग्रामस्थ व सत्ताधारी मंडळी यांच्यात काही काळासाठी खडाजंगी झाली परंतु गावच्या विकासासाठी विविध ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
कोळकी ग्रामपंचायतीच्या सावित्रीबाई फुले सभागृहात तहकूब ग्रामसभा सरपंच सौ. स्वप्ना कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती. यावेळी उपसरपंच विकास नाळे, ग्रामविस्तार अधिकारी रमेश साळुंखे, सदस्या सौ. लक्ष्मी निंबाळकर, सौ. रेश्मा देशमुख, सौ. निर्मला जाधव, सौ. प्रियांका चव्हाण, गणेश शिंदे, अक्षय गायकवाड, डॉ. अशोक नाळे, अंगणवाडी सेविका सौ. जठार, कार्यालयीन अधीक्षक कैलास नाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
नागरिकांनी अतिक्रमण काढावे; अन्यथा कारवाई अटळ
कोळकी गावातील सर्व व्यावसायिक व रहिवासी यांना अतिक्रमण काढून घेण्यात यावेत. या पूर्वी सुद्धा अनेक वेळा याबाबत सूचना दिली आहे; आता आगामी काळामध्ये जर अतिक्रमण काढली नाहीत तर त्यांच्यावर कारवाई अटळ आहे; अशी माहिती ग्रामविस्तार अधिकारी रमेश साळुंखे यांनी दिली.
ग्रामसभेसाठी जे शासकीय अधिकारी उपस्थित नाहीत त्यांच्यावर कारवाई
कोळकी ग्रामसभेमध्ये तलाठी, शिक्षण अधिकारी व आरोग्य अधिकारी उपस्थित नसल्याने संदीप नेवसे यांनी असली ग्रामसभा घेवून उपयोग नाही; नावापुरती ग्रामसभा नको अशी मागणी नेवसे यांनी केली. यावर जे गावातील शासकीय अधिकारी उपस्थित नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा ग्रामसभेचा ठराव घेण्यात आला आहे.
आधी खाली नंतर वर कोळकीची ग्रामसभा दोन सभागृहात संपन्न
कोळकीची ग्रामसभा ही सभागृहात न घेता मिटिंग हॉल मध्ये घेतल्याने माजी उपसरपंच रविकिरण सरतापे यांनी मांडल्याने सर्वांनीच या मुद्द्यास अनुमोदन देत सभागृहात पुन्हा सभा भरवण्यात आली. त्यामुळे आधी खाली असलेल्या मिटिंग हॉलमध्ये व नंतर वरील सभागृहात ग्रामसभा संपन्न झाली.
कोळकीसाठी नव्याने पाणी पुरवठा योजना करा
नुकतीच कॅनॉलला पाणी गेल्याने कोळकी गावामध्ये 8 दिवस पाणी पुरवठा करण्यात आला नव्हता; त्यामुळे नागरिकांचे हाल झाले तरी कोळकी गावाची भविष्यातील वाढीव लोकसंख्या गृहीत धरून भव्य दिव्य पाणी पुरवठा टॅंक बांधवण्यात यावा अशी मागणी तुकाराम गायकवाड यांनी केली त्यावर उपसरपंच विकास नाळे यांनी कोळकी व जाधववाडी गावची एकत्रित पाणी पुरवठा योजना करण्यात आली आहे; लवकरच योजनेचे प्रत्येक्षात कामकाज सुरू होईल; अशी माहिती दिली.
कोळकीत सर्पमित्रांना आधुनिक सामग्री उपलब्ध करून द्या
कोळकीमध्ये साप त्यामध्ये धामण, घोणस व मण्यार हे फार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत याची उपाययोजना म्हणून कोळकी गावातील सर्पमित्र यांच्याशी ग्रामपंचायतीने करार करून त्यांना आवश्यक ते सामग्री उपलब्ध करून द्यावी अशी मागणी किरण बोळे यांनी केली असता यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल; असे आश्वासन उपसरपंच विकास नाळे यांनी दिले.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या नजीक तलाठी ऑफिस हवे
कोळकीच्या ग्रामपंचायतच्या नजीक तलाठी ऑफिस करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली; यावर तहसीलदार व प्रांताधिकारी यांना सविस्तर प्रस्ताव तयार करून देण्यात यावेत; असे निर्देश ग्रामविस्तार अधिकारी रमेश साळुंखे यांनी दिले.
लांब पल्ल्याच्या गाड्यांचा कोळकीत थांबा करा
कोळकी गावामध्ये एसटी महामंडळाच्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवणे गरजेचे आहे. कोळकीच्या लोकसंख्येचा विचार करता कोळकीमध्ये सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांचा थांबा करावा; असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
कोळकीत विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण द्या
महिला व बालकल्याणच्या माध्यमातून कोळकी गावातील ज्या मुली आहेत त्यांना संगणक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात यावे असा ठराव मागेच करण्यात आला होता असा प्रश्न किरण बोळे यांनी उपस्थित केला; परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. याबाबत आता आगामी काळामध्ये योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.
कोळकीसाठी शववाहिका घेतली जाणार
कोळकीमध्ये शववाहिका करण्यात यावी; अशी मागणी किरण बोळे यांनी केली असता त्यावर कोळकीमध्ये शववाहिका करण्यात यावी असा ठराव करण्यात आला.
कोळकीच्या सदस्यांमध्येच मेळ नाही; राजन खिलारे यांचा आरोप
आताच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या मध्येच मेळ नाही असा आरोप युवा नेते राजन खिलारे यांनी केल्यावर उपसरपंच विकास नाळे यांनी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांमध्ये मेळ असल्यानेच कोळकीचा विकास सुरू आहे; असे स्पष्ट केले.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम गायकवाड यांनी जेष्ठ पत्रकार राजेंद्र पोरे यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला त्यास सरपंच यांनी मान्यता देत ग्रामसभेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली.
ग्रामविस्तार अधिकारी रमेश साळुंखे यांनी कोळकी ग्रामपंचायतीचे प्रस्तावित अंदाजपत्रकाचे वाचन केले व प्रास्ताविक केले.
आभार उपसरपंच विकास नाळे यांनी मानले.