
दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२२ । फलटण । जागतिक मृदा दीन निमित्त ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, बारामती, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑन क्लायमेट अँक्शन अँड रीनिव्हड अर्थ (IICARE), श्रीमंत नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट, अजैविक ट्रेस प्रबंधन संस्था, माळेगाव खुर्द व महाराष्ट्र शासन कृषि विभाग, फलटण एज्युकेशन सोसायटी, गोविंद फाऊंडेशन, फलटण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मृदा आरोग्य दीन आणि फलटण पूनर्वनिकरण व संवर्धन प्रकल्प मौजे जावली ता. फलटण येथे आयोजित करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑन क्लायमेट अँक्शन अँड रीनिव्हड अर्थ (IICARE) चे डायरेक्टर डॉ. संतोष भोसले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना जमिनीचे आरोग्य शाश्वत ठेवणे ही काळाची गरज आहे तसेच शेतकऱ्यांनी जमिनीतील प्राथमिक व दुय्यम अन्नद्रव्ये मृदा चाचणी प्रयोगशाळेतून तपासून घेवुन त्याप्रमाणे जमिनीमध्ये शिफारशीनुसार खते वापरावीत असे शेतकऱ्यांना आवाहन केले.
या कार्यक्रम प्रसंगी फलटणचे उपविभागीय कृषी अधिकारी भास्कर कोळेकर यांनी जमिनीतील सेंद्रिय कर्ब व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. अर्जुन तायडे, प्रमुख वैज्ञानिक, अजैविक ट्रस्ट प्रबंधन संस्था, माळेगाव खुर्द यांनी शेतकऱ्यांना माती व पाणी परीक्षण करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले. पुणे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख यांनी पिकानुसार अन्नद्रव्यांची शिफारस करणे या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. गोविंग मिल्कचे महाव्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड यांनी जमिनीतील सुपिकता व अन्नद्रव्यांची गरज या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे मृदा शास्त्र तद्न्य डॉ. विवेक भोईटे यांनी बदलत्या हवामानानुसार पिकांसाठी अन्नद्रव्यांची शिफारस व जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांची असणारी किफायतशीरपणा या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांची पिकांना होत असणारे फायदे या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
अजैविक ट्रस्ट प्रबंधन संस्था, माळेगाव खुर्दचे शास्त्रज्ञ डॉ. संग्राम चव्हाण यांनी जमिनीतील व पिकांतील अजैविक ट्रेस व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. अजैविक ट्रस्ट प्रबंधन संस्था, माळेगाव खुर्दचे शास्त्रज्ञ डॉ. विजय काकडे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील जमिनीसाठी आवश्यक असणारे मुलभूत अन्नद्रव्ये व त्यांचा वापर या विषयावर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रम प्रसंगी जागतिक मृदा आरोग्य दीन साजरा करण्यात आला व शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्याचे महत्व पटवून देण्यात आले. या प्रसंगी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पथनाट्य व पोस्टर प्रेझेंटेशन सादर करून जमिनीच्या आरोग्याचे महत्व शेतकऱ्यांना पटवून दिले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. धीरज शिंदे, डॉ. अलिझा प्रधान, डॉ. व्ही. राजगोपाल, शास्त्रज्ञ, अजैविक ट्रेस प्रबंधन संस्था, माळेगाव खुर्द महाविद्यालयाचे प्रा. आप्पासाहेब शिंदे, प्रा. अश्विनी ससाणे, डॉ. प्राजक्ता खरात-मेटकरी, प्रा. गणेश शिंदे, कृषि विभागाचे श्री. दत्तात्रय राऊत, श्री. सुरज फुले आणि जावली व परिसरातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.