
स्थैर्य, 27 मार्च, सातारा : पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा बचतीचा जागतिक संदेश देणारा ‘अर्थ अवर डे हा दिवस यंदा शनिवार, दि. 28 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. या उपक्रमानिमित्त नागरिकांनी रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत अत्यावश्यक दिवे वगळता सर्व वीज उपकरणे बंद ठेवून सहभाग नोंदवावा, असे आवाहन पर्यावरण अभ्यासक तथा माणदेश विकास फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धवराव बाबर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
बाबर यांनी म्हटले आहे की, ‘अर्थ अवर’ हा केवळ एक तास वीज बंद ठेवण्याचा उपक्रम नसून पर्यावरण संवर्धनासाठीची जागरूकता निर्माण करणारी एक जागतिक चळवळ आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर होणारा ऊर्जेचा अपव्यय रोखणे, कार्बन फूटप्रिंट कमी करणे आणि हवामान बदलाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ‘वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर’ (थथऋ) या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत ‘अर्थ अवर’चे आयोजन केले जाते. 2007 पासून सुरू झालेल्या या उपक्रमात आज जगभरातील शेकडो देशांतील लाखो लोक, संस्था आणि उद्योग सहभागी होतात. अनेक ऐतिहासिक वास्तू, प्रसिद्ध इमारती आणि सार्वजनिक ठिकाणेही या दिवशी प्रतीकात्मक स्वरूपात अंधारात ठेवली जातात.
‘अर्थ अवर’च्या माध्यमातून नागरिकांना निसर्ग संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच शाश्वत विकासाची गरज अधोरेखित केली जाते. हवामान बदल, वाढते तापमान, नैसर्गिक संसाधनांचा र्हास आणि अलीकडील जागतिक संकटे लक्षात घेता, या उपक्रमाचे महत्त्व अधिक वाढले आहे. या एक तासाच्या प्रतीकात्मक कृतीतून ऊर्जा बचतीचा मोठा संदेश दिला जातो.
याशिवाय, ‘अर्थ अवर’ची अधिकृत मोहीम जगभरातील नागरिक, उद्योग आणि नेतृत्व यांना एकत्र आणून पर्यावरणविषयक चर्चेला चालना देते. डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने लोक या मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरण रक्षणासाठी आपली बांधिलकी व्यक्त करतात.
वीज बंद ठेवल्याने केवळ ऊर्जेची बचत होत नाही, तर कार्बन उत्सर्जन कमी होण्यासही मदत होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने हा उपक्रम समजून घेत सक्रिय सहभाग नोंदवणे गरजेचे आहे, असेही बाबर यांनी नमूद केले.
चला, निसर्ग रक्षणासाठी एक पाऊल उचलूया आणि ‘अर्थ अवर’ मोठ्या उत्साहात साजरा करूया, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले आहे.

