कावडी (जावली) येथे रविवारी भव्य महिला सन्मान सोहळा


जावली तालुक्यातील कावडी येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने २९ मार्च रोजी भव्य महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २७ मार्च : जागतिक महिला दिनानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने जावली तालुक्यातील कावडी येथे रविवारी (२९ मार्च) दुपारी ४ वाजता भव्य महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी दिली.

विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणि कावडी ग्रामपंचायत विकासाचा उत्सव याचे औचित्य साधून हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात येईल. यासोबतच नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

मान्यवरांची मांदियाळी

या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे आणि उपाध्यक्ष राजू भोसले उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहतील. तसेच, अभिनेत्री संजना काळे आणि अभिनेता संदीप पाठक यांचीही विशेष उपस्थिती असणार आहे.

“या भव्यदिव्य सोहळ्याला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन वसंतराव मानकुमरे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!