कासच्या नाईट सफारी ला आता कायदेशीर आव्हान; निसर्ग प्रेमिंचा कासच्या पर्यावरणासाठी नवीन पवित्रा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ मे २०२२ । सातारा । सातारा वनविभागाने सुरु केलेल्या नाईट सफारी ला आता कोर्टात आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या माध्यमातून आव्हान मिळणार आहे. नाईट सफारी च्या नावाखाली हॉटेल व्यावसायिकांचा फायदा करून देणाऱ्या या योजनेवर पर्यावरणप्रेमींनी तीव्र नापसंती नोंदवली आहे. प्राण्यांची अन्नसाखळी आणि त्यांचा एकांत भंग करून होणाऱ्या सफारी चा फायदा काय असा जळजळीत सवाल पर्यावरणप्रेमींनी वनविभागाला केल्याने या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे.

सातारा विभागाने व्यवस्थापन समिती यांच्या माध्यमातून कास पठारावर नाईट सफारी हा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये रात्रीच्या वेळी पर्यटकांना खास जंगलांचे आणि श्वापदांचे दर्शन घडवणे हा त्या मागचा मुख्य हेतू होता. याशिवाय वनविभागाकडे असणारे अपुरे मनुष्यबळ भरून काढण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी आणि पर्यटक असा संयुक्त नाईट पेट्रोलिंग चा कार्यक्रम होणार आहे. वनविभागाच्या या दोन्ही हेतूवर पर्यावरणप्रेमींनी तीव्र आक्षेप नोंदवत नाईट सफारीच्या विरोधात लढा सुरू केला आहे. युवा राज्य फाउंडेशनचे अध्यक्ष महारुद्र तिकुंडे, मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे, तसेच इतर पर्यावरण प्रेमींनी नुकतीच सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांची भेट घेऊन सर्व पर्यावरण प्रेमींची संयुक्त बैठक बोलावण्याचे आवाहन केले होते. मात्र वनविभागाच्या व्यवस्थापनाने या बैठकीला टाळाटाळ सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. कास व्यवस्थापन समितीने केवळ हॉटेल व्यावसायिकांकडून येणारे बुकिंगचा नाइट सफारीसाठी पाठवण्याचा प्रकार उघड झाल्याने पर्यावरण प्रेमींच्या संतापात भर पडली आहे.

मुख्यत्वे दर्दी पर्यटकांनी या नाईट सफारी कडे पाठ फिरवली आहे. पण मौजमजा करणाऱ्या पर्यटकांनी हॉटेलिंग बरोबर नाईट सफारीचा ही आनंद लुटताना पर्यावरणाचे संकेत पायदळी तुडवणे असे दोन-तीन प्रकार समोर आल्याचे माहिती आहे. कास संयुक्त वन व्यवस्थापन समितीने या बाबतीत मात्र कानावर हात ठेवले आहेत. या सर्व प्रकरणाची गंभीर दखल साताऱ्यातील पर्यावरणप्रेमींनी घेत या नाईट सफारीला जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या कारभाराचा सुद्धा पंचनामा मांडला जाण्याची शक्यता आहे. नाईट सफारी बंद करावी का सुरू ठेवावी या मुद्द्यावर स्वतः उपवनसंरक्षक आन पुढेच संभ्रम निर्माण झाला आहे. हा प्रश्न पर्यावरणाच्या संवेदनशीलतेचा असून शासकीय वनविभागाच्या यंत्रणेने याचा गांभीर्याने विचार करून नाईट सफारी बंद करावी व प्राण्यांची अन्नसाखळी शाबूत ठेवावी, असे आवाहन सुनील भोईटे यांनी केली आहे. असे न घडल्यास या प्रकरणाची राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!