स्थैर्य, सातारा, दि. ०५ : सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पुर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहु लागले असून सातारकरांवरील पाणी टंचाईचे संकट दूर होऊन पुढील उन्हाळ्याचा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
कास परिसरात गेल्या महिनाभर अवकाळी पावसाच्या कोसळणाऱ्या जोरदार सरींमुळे तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती तर गुरुवारपासुन कास परिसरात सतत पावसाची रिमझीम सुरु होऊन शनिवारी पावसाने जोरदार हाजेरी लावल्याने शनिवारी मध्यरात्री कास तलाव ओव्हर फ्लो होवुन पाणी सांडव्यावरून वाहु लागल्याने सातारकरांसाठी पुढील वर्षाचा पाणीसाठा पुर्ण क्षमतेने उपलब्ध झाला असल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.
सातारा शहराचा वाढता पसारा व वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरीकांना मुबलक पाणी मिळण्यासाठी पाणीसाठा होणाऱ्या कास तलावच्या भिंतीची उंची वाढवुन आताच्या पाणीसाठ्याच्या तिपटीने धरणात पाणीसाठा होण्यासाठी धरणाची भिंतीची उंची वाढविण्याचे काम गेल्या तीन वर्षापासुन प्रगती पथावर असुन ते ६०% हुन आधिक पुर्ण झाले असून आदयाप उर्वरीत काम बाकी असल्याने सातारकरांना मुबलक पाणी मिळण्यासाठी काही काळ अजुन वाट पाहावी लागणार आहे.