
स्थैर्य, सोमंथळी, दि. ३ नोव्हेंबर : कार्तिकी एकादशीच्या पवित्र दिवशी येथील सुप्रसिद्ध दक्षिणमुखी मारुती मंदिरात शतकाहून अधिक जुनी असलेली काकड आरतीची परंपरा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली. यानिमित्ताने नीरा नदीच्या पवित्र पात्रातही हजारो भाविकांनी दीपप्रज्वलन करून नदीकाठ उजळून टाकला.
पहाटेच्या शांत वातावरणात, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भजनांच्या सुरात ही काकड आरती करण्यात आली. सोमंथळी गावातील भजनी मंडळाने नुकताच राज्यस्तरीय भजन स्पर्धेत खुल्या गटातून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या भक्तीपूर्ण, सुश्राव्य आणि तालबद्ध वादनाचा आनंद यावेळी उपस्थित भाविकांनी घेतला.
कार्तिकी एकादशीनिमित्त येथील पवित्र नीरा नदीमध्येही हजारो भाविकांनी दीपप्रज्वलन केले. नदीच्या काठावर भाविकांनी तिळाच्या तेलाचे व तुपाचे दिवे लावून प्रार्थना केली, ज्यामुळे संपूर्ण नदीकाठ दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. या दिवशी दीपोत्सव केल्याने घरात सुख, शांती व समृद्धी येते, अशी भावना भाविकांमध्ये आहे.

