स्थैर्य, उमरगा, दि.३: ॲट्राॅसिटी ॲक्ट गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या कर्नाटकातील पोलिस पथकाला “तुम्हारे कर्नाटक पोलिस का बहोत हो गया..’ म्हणत आरोपीसह २५ ते ३० जणांच्या जमावाने बेदम मारहाण केली. यात कर्नाटकचे पोलिस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना चार दिवसांपूर्वी रात्री ११ वाजेच्या दरम्यान सीमावर्ती भागातील कराळी शिवारात घडली. याप्रकरणी सोमवारी (दि.१) सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे.
कर्नाटकच्या हुमनाबाद विभागात ॲट्राॅसिटी गुन्ह्यातील आरोपी संतोष पोपकॉर्न हा उमरगा तालुक्यातील कराळी येथे आल्याची माहिती मिळाली होती. २८ जानेवारीला रात्री ११ वाजता बसवकल्याण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गुरुलिंगप्पा गौडा मलप्पा गौडा पाटील, कॉन्स्टेबल मल्लिकार्जुन व प्रशांत हे खासगी वाहनाने कराळीला गेले. तिथे आरोपी संतोष यांच्यासह २५ ते ३० जणांचा जमाव उपस्थित होता. अटक करण्यास आल्याचे सांगताच किरण पवार, मेजर, आसिफ, रफिक, इब्राहिम, बाळू यांच्यासह २५-३० लोकांच्या जमावाने तुम्हारा कर्नाटक पोलिस का बहोत हो गया, संतोष को कैसे ले जा सकते हो, कर्नाटक पोलिस महाराष्ट्र में आने का कैसा हिम्मत हो गया, म्हणत उपनिरीक्षक गौडा पाटील व सोबत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांसह खासगी वाहनाच्या चालकास काठी आणि दगडाने मारहाण केली.